व्हाईस ऑफ देवेंद्र! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परिपत्रक, रोहित पवारांची विद्यापीठ प्रशासनावर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त "व्हॉइस ऑफ देवेंद्र" (Voice of Devendra) ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजीत केली आहे. यावरुन आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
Rohit Pawar : विकसित महाराष्ट्र या विषयाला आधारुन राज्यभरातील युवकांमध्ये वक्तृत्वातून कृती - कृतीतून नेतृत्व घडवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त "व्हॉइस ऑफ देवेंद्र" (Voice of Devendra) ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वारंभ फॉउंडेशन, नाशिक प्रतिष्ठान व आय-फेलोज फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. व्हाईस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचे नसते याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसत असल्याचे रोहित पवार म्हणाले. निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंटप्रमाणे काम करत असल्याचे संपूर्ण देश बघत आहे. आता शिक्षणाची मंदिरे असलेली विद्यापीठे देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच Voice of Democracy मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील असे रोहित पवार म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकावर रोहित पवारांनी टीका केलीय. विद्यापीठाकडून व्हाईस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं आहे. याबाबत विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं आहेय याद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी २ ते ३ मिनिटांचे मराठी भाषण व्हिडिओ स्वरूपात तयार करून www.voiceofdevendra.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. तसेच, स्पर्धकांनी त्यांचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @voiceofdevendra या हँडलला टॅग करून पोस्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील सहभाग पूर्णपणे विनामूल्य असून, नोंदणीसाठी अंतिम तारीख ही 5 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली होती.ही मुदत संपली आहे. स्पर्धेचे मूल्यांकन प्रभावी भाषाशैली, आशयाची खोली, सकारात्मक दृष्टिकोन आणि नेतृत्वदृष्टी या महत्त्वाच्या निकषांवर आधारित असेल. ही स्पर्धा केवळ एक कार्यक्रम नसून, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवणाऱ्या तरुण विचारांची चळवळ आहे. विकासाची व्याख्या नव्या युगात नव्याने मांडण्याचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण, शहरी, निमशहरी अशा सर्व भागांतील युवकांनी आपापल्या भाषाशैलीत, आत्मविश्वासाने आणि राष्ट्रीय भावनेने भरलेली मते या स्पर्धेद्वारे मांडावी अशी आयोजकांची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या:

























