MNS Shiv Sena : ठाकरे सेना-मनसे युतीसाठी 'दिल'से तयार?ठाकरे बंधुंची टाळी देण्या-घेण्याचं टायमिंग जुळणार का?
MNS Shiv Sena Alliance : एकीकडे शिवसेना ठाकरे गट मनसेसोबत युतीसाठी पूर्णपणे अनुकूल आहे. तर दुसरीकडे दोन वेळा तोंड पोळलेली मनसे मात्र अत्यंत सावध भूमिका घेताना दिसत आहे.

मुंबई : शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. यावेळी ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत युती करायला पूर्णपणे सकारात्मक आहे असं संजय राऊत सांगत आहेत. मराठी माणसासाठी मनसे सोबत एक पाऊल पुढे टाकायला मनसे दिलसे तयार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुधानं दोनदा तोंड पोळालेली मनसे ताक सुद्धा फुंकून पिताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही चर्चा सुरु नसल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे मनसे एकत्र येणार का? ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबतच्या युतीसाठी सकारात्मक संकेत मिळतायत का? ठाकरे बंधुंचं टाळी देण्याघेण्यासाठी टायमिंग जुळणार का? संजय राऊतांचं बोलणं ऐकलं की असे अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहात नाहीत.
मराठी माणसासाठी सर्वकाही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमच्या सगळ्यांची चर्चा झाली. मनसे संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे दिलसे ही भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे, सर्व शिवसेना, आम्ही सगळे राज ठाकरे यांच्या सोबत नातं जोडायला पूर्णपणे सकारात्मक आहोत. महाराष्ट्राच्या जनतेचे दोघांवरती भावनिक आणि राजकीय प्रेशर आहे."
उद्धव ठाकरे अनुकूल मात्र...
गेले काही दिवस संजय राऊत सतत ही भूमिका मांडत आहेत. ही भूमिका ऐकून यावेळी ठाकरेंची शिवसेना मनसे सोबत युती करण्यासाठी पूर्णपणे अनुकूल आणि सकारात्मक आहे असंच चित्र उभं राहतं. मात्र उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं, त्यांनी टाकलेल्या अटीशर्ती ऐकल्या की कन्फ्यूजन आणखी वाढलं. उद्धव ठाकरेंच्या बोलण्याचा नेमका काय अर्थ काढायचा ते भल्याभल्यांना लक्षात आलं नाही.
ठाकरे ब्रँड संपणार नाही
मात्र याचा पुढचा अध्याय सुरु व्हायच्या आतच ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावर गेले. मायदेशी परत आल्यानंतर सुद्धा युती चर्चेची गाडी काही पुढे गेलीच नाही. आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. एप्रिलमध्ये दिलेल्या मुलाखतीचा वेगळा अर्थ काढला गेला अशी सारवासारव शुक्रवारी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये केली. त्यामुळे आधीच्या कन्फ्यूजनमध्ये आणखी भरच पडली. ठाकरे ब्रँड संपवायला सुद्धा काहीजण निघाले आहेत, मात्र तो ब्रँड संपणार नाही असा इशाराही दिला.
दोन वेळा तोंड पोळलेली मनसे काय करणार?
मात्र मनसेच्या या युती संदर्भातल्या स्पष्ट भूमिकेनंतर सुद्धा ठाकरेंची शिवसेना म्हणजे संजय राऊत मात्र कमालीचे सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा मनसे सोबत युती करायला तयार असल्याचं संजय राऊत सांगत आहेत. मात्र दोन वेळा तोंड पोळालेली मनसे हे जुनं नातं नव्याने जोडायला त्याच भावनेने तयार आहे का? हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.
पडद्यामागे ना पडद्यापुढे, आमची कुठलीही सध्या बोलणी चालू नाही. आम्हाला कुठलही पत्र आलं नाही. ठाकरे गटाकडून कुठलही अधिकृत असं पत्र नाही. या आधी जेव्हा आम्हाला युती करायची होती तेव्हा आम्ही एक रितसर माणूस पाठवला होता. यांना नवी नाती जोडायची की दुसरी असलेली नाती तोडायची आहेत? असा प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात आला.
गतअनुभाव पाहता उद्धव ठाकरे आपल्याला शेवटपर्यंत झुलवत ठेवतील अशी शंका मनसेला वाटतेय. तसं झालं तर ना महायुती ना मविआ अशी त्रिशंकू स्थिती होईल अशी भीती मनसेला सतावत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं नसेल.
शिवसेना आणि मनसेच्या युती संदर्भात एकीकडे मनसेकडून तसा सावध पवित्रा घेतला जात असताना किंवा कुठल्याही प्रकारे स्पष्ट भूमिका मांडली जात नसताना ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र पूर्णपणे सकारात्मक भूमिका युती संदर्भात मांडली आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवकाश आहे. त्यामुळे या नुसत्या चर्चेनंतर प्रत्यक्षात काही घडामोडी घडतात का यावर संपूर्ण राज्यातील राजकारण अवलंबून असणार आहे.
























