टीईटी घोटाळ्यात आणखी मोठे घबाड, अश्विन कुमार या आरोपीकडून कोट्यावधींचे सोने, चांदी हिरे जप्त
तुकाराम सुपेकडून पावणेचार कोटींचं घबाड जप्त केल्यानंतर शुक्रवारी रात्री पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या घरावर छापा टाकून एक कोटी एक लाख 95 हजार 805 रूपयांचे दागिणे जप्त केले.
TET Exam Scam : पेपर फुटी आणि परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत खूप महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. यामध्ये सहभागी अनेक आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरांमधून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केलेल्या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी तुकाराम सुपेकडून जवळपास पावणेचार कोटींचं घबाड जप्त केल्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या घरावर छापा टाकून तब्बल एक कोटी एक लाख 95 हजार 805 रूपयांचे दागिणे जप्त केले आहेत.
शुक्रवारी रात्री पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घरावर छापा टाकला. यात त्याच्या घरातून तब्बल 27 किलो चांदी, दीड किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्दे मालाची किंमत जवळपास एक कोटी एक लाख 95 हजार 805 रुपये आहे.
अश्विनकुमार हा जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख आहे. या प्रकरणात सुरुवातीला जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रीतिश देशमुख याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आजी-माजी आयुक्तांना या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर याचे धागेदोरे थेट बंगळुरू येथील अश्विनकुमारपर्यंत जाऊन पोहोचले होते. काही दिवसांपूर्वीच त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथक शुक्रवारी त्याच्या बंगळुरू येथील निवासस्थानी पोहोचले. या ठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी हिरे, सोनं, चांदी असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, अश्विन कुमार याने आणखी पैसे आणि सोने त्याच्या मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे दिले आहेत का? याचा पोलीस तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या