Maharashtra Politics : थँक्यू मर्सिडिज! आरोप-प्रत्यारोपांचा गिअर्स जोरात, राजकारण्यांची सीक्रेट्स बाहेर
Neelam Gorhe Vs Sanjay Raut : नीलम गोऱ्हे यांनी आरोप केल्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर प्रत्यारोप केला. दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या चिखलफेकीतून राजकारणातील अनेक गोष्टी बाहेर येताना दिसत आहेत.

मुंबई : मर्सिडीज... अनेकांची ड्रीम कार. पण सध्या ही मर्सिडीज महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार धावताना दिसतेय. मर्सिडीजच्या बदल्यात ठाकरे पद देतात असा आरोप करत नीलम गोऱ्हेंनी पहिला गिअर टाकला. आरोपांची मर्सिडीज सुसाट धावू लागल्यावर संजय राऊतांसह ठाकरेंच्या अनेक नेत्यांनी प्रतिआरोपांचे रिव्हर्स गिअर टाकले. मात्र या मर्सिडीज प्रकरणामुळे आतापर्यंत सीक्रेट म्हणून दडवून ठेवण्यात आलेली अनेक राजकीय प्रकरणं चव्हाट्यावर आली. म्हणून महाराष्ट्र मनोमन नक्कीच म्हणत असेल... थँक्यू मर्सिडीज
कोण काय म्हणालं?
नीलम गोऱ्हे यांच्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, निर्लज्ज बाई आहे, हा शब्द असंवैधानिक नाही. नीलम गोऱ्हे यांचं विधान म्हणजे त्यांची विकृती दिसतेय. त्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात? अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नव्हते .
संजय राऊतांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंसोबत राहून त्यांची पातळी किती खालवली आहेत हेच संजय राऊत दाखवतात. तर महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत असं चित्रा वाघ म्हणाल्या.
दिल्लीच्या साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हेंनी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप केले. उद्धव ठाकरेंनी स्वत: त्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. पण स्वामीनिष्ठ संजय राऊतांनी मात्र हा मुद्दा फारच मनाला लावून घेतला. त्यांना संताप एवढा अनावर झाला होता की त्या भरात तोल सुटेपर्यंत, असंसदीय भाषा वापरत त्यांनी नीलम गोऱ्हेंना लक्ष्य केलं.
संजय राऊतांकडून लक्ष्यवेधी बाण
काट्यानं काटा काढला जातो तसं संजय राऊतांनी नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीज आरोपांना उत्तर देण्यासाठी लक्षवेधी प्रकरणाचा बाण काढला. शिवसेना फुटल्यानंतर नव्याने ठाकरेंच्या शिवसेनेत सामील झालेल्या सुषमाताई अंधारे यांनीही नीलमताईंवर चांगलेच तोंडसुख घेतले. नीलम गोऱ्हेंवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ही खिंड लढवण्यासाठी त्यांच्या साथीला अंबादास दानवे सुद्धा मैदानात उतरले. ठाकरे गटाकडून होत असलेल्या जहाल टिकेला शिवसेनेकडूनही जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न झाला.
नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंवर आरोप केले, त्यावर संजय राऊत आणि कंपनीने प्रत्यारोप केले. या दोघांच्या भांडणांमुळे आपल्या राजकीय पक्षांचा कारभार कसा चालतो याची एक झलक आपल्याला पाहायला मिळतेय. सत्तेसाठी कधी कोणाची मदत लागेल सांगता येत नाही म्हणूनच आपले राजकीय नेते नेहेमी एकमेकांच्या चुका सावरुन घेताना पाहायला मिळतात. त्यांचं हित साधतं, पण जनतेला झळ बसते. नीलम गोऱ्हे-संजय राऊत एपिसोडमुळे आपल्या राजकारण्याचं खरं रुप समोर येत राहावं अशीच महाराष्ट्राची भावना असेल. या वाईटातून काही चांगलं घडत असेल तर कोणाची ना नसेल.
ही बातमी वाचा:
























