काकाच्या मदतीला धावला पुतण्या, अजित पवारांवर पातळी सोडून बोलणाऱ्या पडळकरांना फडणवीसांनी समज द्यावी, नाहीतर; वाचा काय म्हणाले रोहित पवार
Rohit Pawar On Gopichand Padalkar : अजित पवार यांच्यावर टीका केल्यानतंर आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येतंय.
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar) यांनी 'लांडग्याचं पिल्लू' म्हणत टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज द्यावी, अन्यथा पवारांवर टीका करण्यासाठीच त्यांना आमदारकी दिल्याचं जाहीर करावं असं ते म्हणाले.
अजित पवार यांनी मी उपमुख्यमंत्री मानत नाही, ते म्हणजे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यावर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय. याच विषयावर आता आमदार रोहित पवारांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात. उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना फडणवीस साहेबांनी समज द्यायला हवी, अन्यथा टीका करण्यासाठीच अशा वाचाळवीरांना आमदारकी दिली हे जाहीर करावं. कुठल्याही पक्षाचे नेते असोत त्यांच्यावर टीका टिप्पणी करताना सर्व पक्षांनी महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का बसणार याची काळजी घायलाच हवी.
राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 18, 2023
उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना फडणवीस साहेबांनी समज द्यायला हवी, अन्यथा टीका…
फडणवीसांकडे तक्रार करणार, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
अजित पवारांवर पातळी सोडून बोलणाऱ्या गोपीचंद पडळकरांची तक्रार आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितलं.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अजित पवारांवरील वादग्रस्त वक्तव्याचा अकोल्यात राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला आहे. आमदार अमोल मिटकरींच्या नेतृत्वात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. भाजपने वेळीच पडळकर यांना आवरण्याचा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ 'जोडो मारो आंदोलन' करण्यात आलं.
ही बातमी वाचा: