(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शब्द हिरमुसले, सूर थांबले, लता मंगेशकर अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Lata Mangeshkar Last Rites : संपूर्ण देशवासियांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत. प्रत्येक भारतीयांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत.
Lata Mangeshkar Last Rites : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रविवारी सायंकाळी सात वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण देशवासियांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत. प्रत्येक भारतीयांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या अंतिम संस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर शिवाजी पार्कमध्ये उपस्थित होते.
प्रभूकुंज निवासस्थानावर दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत लतादीदींचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर लतादीदींचं पार्थिव दादर शिवाजी पार्कमध्ये आणलं गेलं. त्यापूर्वी पोलिसांनी लतादीदींना मानवंदना दिली. दुपारी तीन वाजता लतादीदींची अंत्ययात्रा निघाली होती. यावेळी लतादीदींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी जमली होती. पेडर रोड, हाजी-अली, वरळी नाडा, प्रभादेवी, सिद्धीविनायक मंदीर यामार्गे शिवाजी पार्कपर्यंत अंत्ययात्रा पोहचली. तसेच मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनीही चोख व्यवस्था केली आहे. त्यांच्या पार्थिवाच्या पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूंना पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला. संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय पार्थिवासोबत होतं. अंत्ययात्रेला चाहत्यांची गर्दी जमली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर दिग्गज मान्यवर शिवाजी पार्कवर यावेळी उपस्थित होते.
#WATCH | State honour being given to veteran singer Lata Mangeshkar at Mumbai's Shivaji Park pic.twitter.com/awsKdkSarh
— ANI (@ANI) February 6, 2022
अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी -
लतादीदींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी शिवजीपार्कवर गर्दी उसळली होती. चाहत्यांनी लता दीदींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सर्वसामान्यांसह राजकीय नेते आणि कलाकारही शिवाजी पार्कवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, विद्या बालन, आमिर खान, रणबीर कपूर, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, जावेद अख्तर, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप पळसे पाटील, शाहरुख खान, श्रद्धा कपूर, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पियुष गोयल, अनिल देसाई यांच्यासह अनेक दिग्गजांनी यावेळी उपस्थिती दर्शवली होती.
भारतरत्नसह विविध पुरस्कारांनी सन्मान -
लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारतामधील ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.