(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Phone Tapping Case : रश्मी शुक्ला यांच्याविरोधात तपासयंत्रणेकडे सबळ पुरावे
Maharashtra Phone Tapping Case : फडणवीसांनी 'एबीपी माझा'वर केलेल्या 'त्या' गौप्यस्फोटाची महाविकास आघाडी सरकारनं घेतली दखल
Maharashtra Phone Tapping Case : रश्मी शुक्ला यांच्याविरोधात तपासयंत्रणेकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे याप्रकरणातून त्यांना वगळता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका सोमवारी राज्य सरकारनं हायकोर्टात मांडली. फोन टॅपिंग प्रकरणातील गोपनीय अहवाल बाहेर आलाच कसा?, याचा तपास होणं आवश्यक आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहीवर बोलताना यासंदर्भातील ज्या 6 जीबीच्या पेन ड्राईव्हचा उल्लेख केला होता. तो विरोधी पक्षनेत्यांपर्यंत कसा पोहचला?, तसेच 'तो' पेन ड्राईव्ह शुक्ला यांच्याकडूनच दिला गेलाय का? यासाठी त्याची न्यायवैद्यकीय चाचणी होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचा ताबा मिळवण्यासाठी आम्ही दंडाधिकारी कोर्टात रितसर अर्जही केल्याचं विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी हायकोर्टाला सांगितलं.
या गोष्टींचा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण रश्मी शुक्ला यांनीच हा अहवाल तयार करून तो गोपनीय असल्याचं जाहीर केलं होत. तसेच त्यांनीच तो सरकार दफ्तरी जमाही केला होता. मग यातली कागदपत्र गहाळ कशी झाली?, याचंही उत्तर त्यांनी द्यायलाच हवं. त्यामुळे रश्मी शुक्ला यांना कठोर कारवाईपासून तूर्तास दिलासा दिलेला असला तरी फोन टॅपिंग प्रकरणी सरसकट दिलासा देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केली.
फोन टॅपिंग प्रकरणात वरीष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलीस आरोपी करणार आहे का?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केला होता. मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि त्याबाबतचा गोपनीय अहवाल लिक करणं यासंबंधी मार्चमध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेमुळे शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. यावर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारनं आतापर्यंत याप्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाचा सीलबंद अहवालही हायकोर्टात सादर केला. मात्र रश्मी शुक्ला यांना दिलासा द्यायचा की नाही यावर गुणवत्तेच्या आधारेच युक्तिवाद करणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केल्यानं कोर्टानं या अहवालाची दखल घेतली नाही.
मुंबई पोलिसांनी अद्याप शुक्ला यांना आरोपी केलेले नाही, मात्र सध्या तपास सुरू आहे असं आपल्या प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी म्हटलेलं आहे अशी माहिती विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी हायकोर्टाला दिली आहे. जर शुक्ला यांना आरोपी केलेलं नसेल आणि त्यांना पोलीस आरोपी करणार नसतील तर याचिकेवर सुनावणी घेऊन वेळ वाया घालवणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यामुळे जेव्हा त्यांना आरोपी केलं जाईल तेव्हा त्या पुन्हा न्यायालयात याचिका करु शकतात असेही न्यायालयानं स्पष्ट केलं. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे फोन टॅप केले आणि यासंबंधी तयार केलेला गोपनीय अहवाल गैरप्रकारे उघड केला असा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे. मात्र वरिष्ठांना विचारुनच हे फोन टॅप केले होते असा दावा शुक्ला यांनी केला आहे. तसेच हा तपास सीबीआयकडे सुपुर्द करावा आणि कठोर कारवाईपासून संरक्षण द्यावे अशी मागणी शुक्ला यांनी हायकोर्टाकडे या याचिकेतून केलेली आहे.