मोठी बातमी: आता वाऱ्याच्या वेगाने गाड्या पळणार, चार दिवसानंतर राज्यातील महामार्गांवरील स्पीड वाढवणार
National Highway Speed Limit : राज्य सरकार आणि केंद्रात याबाबत वेगवेगळे नियम असल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत होता.
National Highway Speed Limit : देशातील द्रुतगती मार्ग (Expressway) आणि राष्ट्रीय महामार्गांवरील (National Highway) वाहनांची वेगमर्यादा (Speed Limit) वाढवली जाणार असून, पुढील चार दिवसांत याबाबत आदेश काढला जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. राज्य सरकार आणि केंद्रात याबाबत वेगवेगळे नियम असल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत होता. त्यामुळे यावर तोडगा काढण्यात आला असून, चार दिवसांत याचे आदेश निघणार असल्याचे गडकरी म्हणाले आहेत.
सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वाहनांसाठी निश्चित केलेली कमाल वेग मर्यादा (Maximum Speed Limit) राष्ट्रीय महामार्गांवर 100 किमी प्रतितास इतकी आहे. तर द्रुतगती मार्गांवर 120 किमी प्रतितास इतकी वेगमर्यादा आहे. मात्र असं असले तरीही याच महामार्गावर तैनात असलेले राज्य महामार्ग पोलीस गाडी 90 च्या वरती गेल्यावर 2 हजारांचा दंड ठोठावतात. त्यामुळे केंद्र आणि राज्यात याबाबत समन्वय नसल्याने याचा फटका वाहनचालकांना बसत होता.
दरम्यान याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दाखवत सर्व प्रकार समोर आणला होता. त्यानंतर याची दखल घेत गडकरी यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी त्यांनी देशातील सर्वच राज्यातील रस्ते वाहतूक मंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर आता यावर तोडगा काढण्यात आला आहे. तर पुढील चार दिवसांत नवीन वेग मर्यादेबाबत आदेश काढले जाणार असल्याचे गडकरी म्हणाले आहेत.
काय म्हणाले गडकरी?
पैठण येथे पत्रकार परिषदेत 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, या विषयात केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही अधिकार आहे. मी यासाठी दिल्लीत रस्ते वाहतूक मंत्र्यांची बैठक बोलावली होती. ज्यात सर्वांचा सल्ला घेतला. ज्यात नवीन स्पीड अंतिम करण्यात आली आहे. तसेच याबाबत पुढील तीन चार दिवसांत आदेश काढण्यात येणार आहे. या आदेशात स्पीड वाढवण्यात आली आहे. पण यात दोन प्रकारचे मतं आहेत. ज्यात 140 किलोमीटरची स्पीड ठेवण्यास काहींचा विरोध आहे, तर काहींचा पाठींबा आहे. त्यामुळे यातील समन्वय साधून स्पीड ठरवण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारला दोन-तीन दिवसांत गॅझेट नोटिफिकेशन जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकार सुधारित गॅझेट नोटिफिकेशन काढतील. यातून तुम्हाला दिलासा मिळणार असून, पण तो दिलासा काय असणार आहे हे आत्ताच सांगणार नसल्याचे गडकरी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: