'समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?' राज्यपाल कोश्यारींचं वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादी आक्रमक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं आज पुण्यात आंदोलन करणार आहे. सकाळी 10.30 वाजता हे आंदोलन सुरु होणार आहे.
नेमकं काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी
समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो असंही कोश्यारी म्हणाले. औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे की, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. राम मंदिर कार्यक्रम सुरू असताना मला समर्थ रामदासांचे नाव आठवत होते. शक्तीची सर्वत्र पूजा होते. वेळोवेळी देशात संतांचे कार्य दिसले आहे. शक्ती सर्वकाही आहे, त्यामुळे शक्तीची आराधना केली जाते. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. चाणक्याविना चंद्रगुप्तांना कोण विचारेल? समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असं राज्यपालांनी म्हटलं आहे. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे, असंही ते म्हणाले. नोट आणि वोटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे. माजी आमदार, खासदारांना कोणी विचारत नाहीत, असंही ते म्हणाले.
राज्यपालांच्या विरोधात आंदोलन, सोशल मीडियातूनही टीका
राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं आज पुण्यात आंदोलन करणार आहे. सकाळी 10.30 वाजता हे आंदोलन सुरु होणार आहे. संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली असून सोशल मीडियातून देखील राज्यपालांवर टीकेचा भडिमार होत आहे. राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.