Maharashtra Coronavirus : राजेश टोपे यांचे वक्तव्य, राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात, पण...
Maharashtra Coronavirus Updates : राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून घाबरून न जाण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून चढ-उतार दिसू लागल्याने सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून घाबरण्याचे, चिंता व्यक्त करू नये असे त्यांनी म्हटले. मागील काही दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात मास्कची गरज नाही, मात्र, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, आम्ही सध्या ट्रेकिंग यंत्रणेवर अधिक जोर दिला आहे. टास्क फोर्सकडूनही माहिती घेतली जात आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीवर आमचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांचे लसीकरण सुरू असून 12 ते 15 या वयोगटातील मुलांनादेखील लस दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे. सध्या हे बुस्टर डोस खासगी रुग्णालयातून दिले जात असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ज्या पाच राज्यांना पत्र पाठवलंय. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली.
दिल्लीत मास्क अनिवार्य
दिल्लीत कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येनंतर दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मास्क वापर पुन्हा एकदा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
वाढत्या संसर्गामुळे केंद्राचं राज्यांना पत्र
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये सतत वाढणाऱ्या कोरोना सकारात्मकतेच्या दराचा उल्लेख करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयाने याबाबत आवश्यक पाऊलं उचलण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यांनाही सतर्क राहण्याचा सूचना ही देण्यात आल्या आहेत.