बजरंग सोनावणेंनी पुन्हा घेतली जरांगेंची भेट; म्हणाले, सर्व खासदार-आमदारांना एकत्र करणार
Beed Khasdar Bajrang Sonwane : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मागील 6 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत.
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मागील 6 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे अनेक खासदार आमदार त्यांच्या भेटीसाठी जात आहेत. मनोज जरांगे पाटील सगेसोयऱ्याचं आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Beed Khasdar Bajrang Sonwane) यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मध्यरात्री ते मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी पोहचले होते.
लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. 8 जून 2024 पासून त्यांचं उपोषण सुरु आहे. आंतरवाली सराटी येथे जाऊन अनेक नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही काल मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. याआधी खासदार झाल्यानंतर 5 जून रोजी मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.
राज्यातील सर्व खासदारांना एकत्र करून राज्यपालांची आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार - सोनवणे
बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी दुसऱ्यांदा अंतरवालीत सराटीमध्ये येत मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मनोज जरांगे यांच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एकत्र करून आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचं यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितलं. बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसाठी राज्यपालांना पत्रही लिहिले आहे.
बजरंग सोनवणे यांचं राज्यपालांना पत्र -
खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्यपाल यांना पत्र लिहून मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी म्हटलेय की, 8 जून 2024 पासून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणास बसले आहेत. मागील पाच दिवसांपासून त्यांनी अन्न, पाणी त्याग केलेला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी महाराष्ट्र राज्य शासनाची भूमिका उदासिनतेची दिसून येत आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने वेळीच दखल न घेतेलस्यास राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याप्रकऱणी आपण स्वत: लक्ष घालून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारला सूचित करावे.
प्रति,
— Bajrang Sonwane (@bajrangsonwane_) June 12, 2024
महामहीम राज्यपाल महोदय,
राजभवन, महाराष्ट्र राज्य,
मुंबई यांना सदर पत्र ईमेल द्वारे पाठवण्यात आलेले आहे. pic.twitter.com/wLQYghK3uF
आतापर्यंत जरांगे पाटील यांची भेट कुणी कुणी घेतली ?
जालना जिल्ह्याचे खासदार डॉ. कल्याणराव काळे, परभणीचे बंडू जाधव,हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील, अहमदपूर आमदार बाबासाहेब पाटील, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.