मुंबई पोलीस 5 तास 'शिवतीर्थ' बंगल्यावर ताटकळले, अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारलीच नाही; म्हणाले..
नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
Amit Thackeray : नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पुत्र अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही त्रास का घेतला, मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो असे अमित ठाकरे म्हणाले. दरम्यान, अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारली नाही. पाच तासानंतर नेरुळ पोलीस नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अमित ठाकरे हे रविवारी नेरुळ पोलीस स्थानकात स्वतः जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमित ठाकरेंसह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल
नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणी अमित ठाकरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित ठाकरेंना नोटीस बजावण्यासाठी पोलिसांकडून दीड तास प्रतीक्षा करण्यात आली. दीड तासानंतर सुद्धा अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही. दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे 16 नोव्हंबर रोजी नवी मुंबईच्या (Navi Mumbai) दौऱ्यावर आले होते. अमित ठाकरे हे शाखेच्या उद्घटनासाठी आले असता त्यांना असं कळलं की, नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) स्मारकाचे अनावरण गेल्या अनेक महिन्यांपासून झालेलं नव्हतं. तसेच महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवली होती. हे बघताच अमित ठाकरेंनी स्व:त या पुतळ्याचे अनावरण केलंय. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर पोलीस आणि मनसे सैनिकांमध्ये काही काळ झडप झाल्याचेही चित्र बघायला मिळेल. या कृत्यासाठी माझ्यावर कारवाई होते असेल तर ही माझ्या आयुष्यातील पहिली केस होणार आहे. मात्र वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेवू, असा पवित्र अमित ठाकरेंनी घेतला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा गेल्या चार महिन्यांपासून तयार होऊन आहे. त्यावर आता धूळ साचते आहे. हा पुतळा लोकांच्या मागणीवरून लोकांसाठी झाला आहे. मात्र सरकारमधल्या कुठल्याही नेत्याला अथवा मंत्र्याला महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करायला वेळ मिळत नसल्याचे दिसतंय. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून हे स्मारक धूळखात पडलं आहे. त्यावर धूळ जमतेय, मला ते बघवलं नाही. म्हणून मी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं. मला असं वाटतं माझ्यावर या बाबत कारवाई केली जाईल. मात्र या कारवाईचा मला आनंद आहे.
























