Amol Kolhe: राज्यपालांच्या लोकप्रतिनिधी संवाद कार्यक्रमावर अमोल कोल्हेंचा बहिष्कार; कारणही सांगितलं, म्हणाले....
Amol Kolhe: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हेंनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या पुण्यातील कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. शिवाय, त्यामागील कारणही सांगितलंय.
Amol Kolhe on C.P. Radhakrishnan: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) हे आज पुणे (Pune) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यात आयोजित लोकप्रतिनिधी संवाद कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. पुणे जिल्हाच्या या दौऱ्यात ते जिल्हातील सर्वपक्षीय खासदार, विधान परिषद आणि विधानसभा सदस्य यांच्याशी संवाद साधणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला आता वादाची किनार लाभली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. पुणे जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आणि पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात जाणीवपूर्वक डावलले जात असल्यासह अनेक आरोप करत अमोल कोल्हेंनी बहिष्कार टाकला आहे. यासाठी त्यांनी एक पत्र लिहत याबाबतची माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे?
मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन महोदय, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने आणि छ. संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या पुण्यनगरीच्या पवित्र भूमीवर आपले सहर्ष स्वागत! आज आपल्या पुणे जिल्हा दौऱ्यात जिल्हातील सन्माननीय खासदार, विधान परिषद व विधानसभा सदस्य यांच्याशी संवाद कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागत आहे. कारण पुणे जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आणि पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात जाणीवपूर्वक डावलले जात आहे. राजकीय आणि वैचारिक भूमिका मांडत असताना पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन विकासात्मक भूमिका, समन्वय आणि सुसंवाद ही आपल्या महाराष्ट्र राज्याची प्रगल्भ राजकीय संस्कृती आहे.
केवळ राजकीय आकसापोटी सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपात जाणीवपूर्वक डावलले जात आहे, ही आपल्या महाराष्ट्र राज्याची संस्कृती नाही. राजकीय हेतूर्थ विकासकामांना खीळ बसविण्याची पक्षपाती भूमिका जर घेतली जाणार असेल, तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची आणि जनतेला न्याय मिळवून द्यायची आमची तयारी आहे. तरी आपण यासंदर्भात योग्य दखल घेवून माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला न्याय मिळवून द्यावा, ही विनंती. अशा शब्दात टीका करत खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यपालांच्या लोकप्रतिनिधी संवाद कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अमोल कोल्हेंचा गृहमंत्र्यांवर थेट निशाणा
राज्याचे गृहमंत्री सरकार वाचवण्यामध्ये आणि कुणाकडे नेतृत्व जाणार यामध्ये मशगुल आहेत, असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) यांचा एन्काऊंटर झाल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे. त्यावरच अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याची मोठी बातमी सध्या समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेमध्ये अक्षयने दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यानंतर यामध्ये अक्षय शिंदे दोषी असल्याचं निष्पन्न झालं. पण पोलीस कोठडीत असताना अक्षयला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळई स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
हे ही वाचा