केंद्रीय गृहमंत्री शाहांचा नाशिक दौरा रद्द, आता हे केंद्रीय मंत्री नाशिकला येणार
आंतरराष्ट्रीय योग दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नाशिकला येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला आहे
Nashik News Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बहुचर्चित नाशिक दौरा रद्द झाला असून त्यांच्याऐवजी आता नाशिक दौऱ्यावर गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे येणार असल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नाशिकला येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द होऊन त्यांच्याऐवजी आता केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून गेल्या आठ दिवसांपासून तयारी करण्यात येत होती. यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी 14 पथके देखील कार्यान्वित करून विविध जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या. मात्र रविवार (19) सायंकाळी उशिरा अमित शाह यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कार्यक्रमाची सुरक्षितता सीआरपीएफ जवानांकडे...
मंगळवारी होत असलेल्या नियोजित कार्यक्रमासाठी सुरक्षितेच्या दृष्टीने संपुर्ण नियंत्रण हे सीआरपीएफ जवानांकडे देण्यात आले आहे. साधारणपणे दिडशे लोकांनाच या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दौऱ्यामुळे स्वच्छता, रस्त्यांची डागडुजी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत असल्याने नाशिक शहरातील महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे शाह येणाऱ्या रस्त्यातील साफसफाई करण्यात आली. तसेच शाह हे योग विद्या गुरुकुल तळवडे येथे भेट देणार होते. हा रस्ता देखील अत्यंत खराब अवस्थेत होता. तो देखील खडी डांबर टाकून तात्पुरता व्यवस्थित केला आहे. मात्र दौराच रद्द झाल्याने सगळ्या नियोजनावर पाणी फेरल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Vidhan Parishad Election : भाई जगताप की प्रसाद लाड? विधानपरिषद निवडणुकीत दहाव्या जागेसाठी कडवी लढत