Rohit Pawar : नरेश म्हस्केंच्या आरोपांवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले पवारांवर...
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीदरम्यान रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार हेच फोन करत असल्याचा आरोप करत नरेश मस्के यांनी एकच खळबळ उडवून दिली असताना रोहित पवार यांनी मात्र त्यांच्यावर पलटवार केला आहे.
Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) निवडणुकीदरम्यान रोहित पवार (Rohit Pawar) यांना पाडण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) हेच फोन करत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के यांनी एकच खळबळ उडवून दिली असताना रोहित पवार यांनी मात्र त्यांच्यावर पलटवार केला आहे. आरोप करणारी व्यक्ती फारशी कोणाला माहित नाही त्यांना महापौर करताना ते ज्या गटाचे आहेत त्यांच्याच प्रमुखांनी विरोध केला होता तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदत केली होती, अशी आठवण रोहित पवार यांनी यावेळी मस्के यांना करून दिली.
आज-काल नवीन नेत्यांचा ट्रेंड आलाय आणि पवारांवर टीका केली त्याशिवाय आपण मोठे होत नाही, त्यामुळे अशी टीका केली जाते असे सांगतानाच विरोधकांना पवार कुटुंबीय कधी समजलेच नाही आणि समजणार ही नाही अशा शब्दात पवार यांनी मस्के यांचा समाचार घेतला. दरम्यान आमदार बडतर्फी प्रकरणी निर्णय लवकरात लवकर लागावा निर्णयाला उशीर झाला तर तोही एक प्रकारचा अन्याय असतो असेही रोहित पवार म्हणाले पिंपरी चिंचवड मध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांशी ते बोलत होते.
रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये अशापद्धतीने वक्तव्य करणे. हे लोक स्वीकारत नाही मात्र मागील नऊ महिन्यांमध्ये हा एक ट्रेन्ड झाला आहे. 9 महिने ज्या पद्धतीने हे सरकार वागत आहे. कोर्टानेदेखील या सरकारच्या पद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. नऊ महिने महाराष्ट्रात ज्या गोष्टी सुरु आहे त्या प्रचंड प्रमाणात घातक आहे आणि त्याचं हे सगळं वागणं किंवा राजकारण सामान्य लोकांना यासंदर्भातील माहिती आहे. त्यांच्या या सगळ्या वागण्याला लोकंच लोकशाहीच्या माध्यमातून उत्तर देतील असंही ते म्हणाले.
कोण नरेश म्हस्के?, अजित पवारांचा सवाल
कोण नरेश म्हस्के? मी त्यांना ओळखत नाही. असल्या कोणत्याही स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही. आम्ही असे घरामध्ये पण वागत नाही. जी माझी भूमिका असते तीच भूमिका ठाम असते. रोहित पवार माझ्या कुटुंबातील एक घटक आहे तो माझा पुतण्या आहे तो मला माझ्या मुलासारखा आहे, असा हल्लाबोल त्यांनी नरेश म्हस्केंवर केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी अजित पवारांवर खळबळजनक आरोप केला होता. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडा, असं सांगण्यासाठी खुद्द अजित पवार हे अनेकांना फोन करत होते असा दावा म्हस्के यांनी केला होता.