उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात भाजप विरोधात क्रिकेटचा सामना खेळायला आवडेल ; संजय राऊतांची फटकेबाजी
शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आज क्रिकेटच्या मैदानात चांगलीच फटकेबाजी केली. "मी कधीच थर्ड अंपायर होणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Pune News Update : राजकारणाचे मैदान गाजविणारे शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आज क्रिकेटच्या मैदानात देखील फटकेबाजी केली. "मी कधीच थर्ड अंपायर होणार नाही. मला उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली आत्ताच्या विरोधकांसमोर क्रिकेटचा सामना खेळायला आवडेल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पुण्यातील आंबेगाव येथे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आयोजित केलेले क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी संजय राऊत आज आंबेगावात आले होते. येथे त्यांनी प्रथम माध्यामांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाषण केले आणि क्रिकेटच्या मैदानातही विरोधकांवर निशाणा साधत चांगलीच फटकेबाजी केली.
"मी मुंबईचा आहे, पण आजपर्यंत मी क्रिकेटच्या मैदानात कधीच उतरलो नाही. क्रिकेटची मॅच देखील कधी पाहिली नाही. पण मी मैदानात उतरलो की बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि पंचगिरी सर्व करू शकतो, अशी मिश्किल टिप्पणी देखील संजय राऊत यांनी यावेळी केली.
संजय राऊत म्हणाले, "मी क्रिकेट खेळत नसलो तरी मला त्यातलं ज्ञान आहे. मला सगळ्या गुगल्या टाकता येतात. कारण बाळासाहेबांची मला शिकवण आहे. शरद पवार साहेब देखील सोबतीला आहेत. मला दोन गुरू आहेत. क्रिकेटच्या मैदानात भाषण म्हणजे ही एक गंमतच आहे. सध्या आयपीएल सुरु आहे, पण ही एसपीएल त्यापेक्षा कमी नाही. आयपीएलच्या मैदानात वेगवेगळे झेंडे असतात, इथं मात्र एकच भगवा झेंडा आहे. त्यामुळे हारजीत कोणाची ही झाली तरी जिंकणार भगवाच हे निश्चित आहे. मी जो समान खेळतो तो सामना अनिर्णित राहतो." "आंबेगावच्या या मैदानात रणजी सामने व्हायला हवेत. पश्चिम महाराष्ट्रातील आदर्शवत असं हे मैदान व्हावं, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, "राज्यात महाविकासआघाडीचा प्रयोग सुरू झाला. तो अडीच महिने ही टिकणार नाही. तेंव्हा पासून तारीख पे तारीख दिली जात आहे. आता 1 जूनला सरकार पडेल अशी नवी तारीख दिली गेलीय. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून हे सर्व सुरू आहे. परंतु, तरी देखील आम्ही टिकून आहोत. त्यामुळे पुढील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महाविकासआघाडी पहायला मिळेल. शिरूर लोकसभेत महाविकासआघाडी असावी म्हणून चर्चा होईल.
"पुढील खासदार शिवाजी आढळराव पाटील हेच असतील"
"पुढील खासदार शिवाजी आढळराव पाटील हेच असतील" असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी दिला. ते म्हणाले, काहीही झालं तरी शिवाजी आढळराव हेच भविष्यात संसदेत दिसतील. कारण एकमेव आढळराव असे नेते आहेत, जे पराभवानंतर देखील आऊट ऑफ कव्हरेज गेलेले नाहीत. आज आपल्याकडे इथं खासदार आणि आमदार नाहीत. म्हणून उमेद हरवू नका. कारण आज नाहीत म्हणजे उद्या नसणार असं नाही, हे लक्षात असू द्या. शिवाजी आढळराव हे 24 तास अॅक्टिव्ह असतात. पण शिरूरचे खासदार कधी दिसतात का तुम्हाला? आता महाआघाडी असल्याने मला काही पथ्य, बंधनं पाळावी लागत आहेत."
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या आयोध्या दौऱ्यावरही संजय राऊत यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, रोहित पवार अयोध्येला गेलेत ही चांगली गोष्ट आहे. आम्ही पण जाणार आहोत. सर्वांनीच जावं, कारण अयोध्या धार्मिक आहे, त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू नये.
संजय राऊत म्हणाले, "जुन्नरच्या बिबट सफारीचं मगापासून बोललं जातंय. मगापासून म्हटलं जातंय की ती पळवली जात आहे. पण हे लक्षात ठेवा की इथं समोर बसलेले आपले दोन पायाचे बिबटे आहेत, जे चपळ आहेत. याची जाणीव अजित पवारांना देखील आहे. त्यामुळे ते सबुरीने घेत आहेत. नाहितर त्यांना ही शिवसेनेच्या बिबट्यांबद्दल माहीतच आहे."