Ahmednagar fire LIVE Updates : अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयातील ICUला भीषण आग, 11 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू
fire breaks out at hospital in Ahmednagar : ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Background
fire breaks out at hospital in Ahmednagar : ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. घटना घडली तेव्हा 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 10 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर सात जण भाजले गेल्याचं भोसले यांनी सांगितलं आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं यावेळी भोसले यांनी सांगितलं. आगीत मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. अग्निशामन दलानं युद्धपातळीवर कार्य करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले होते. या भीषण आगीचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून ते पाहून ही आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. कोरोनापासून वाचण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा आगीनं होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शॉर्ट सर्किटनं आग लागली?
आयसीयूला आग लागल्याचं समजताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने कोल्हापूरवरुन रवाना झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मृताचा अद्याप आकडा समोर आलेला नाही. प्रत्येक्षात गेल्यानंतर पाहणी करणार असल्याचं ते म्हणाले. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना तातडीने सरकारी मदत दिली जाईल. तसेच याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
पाहा व्हिडिओ -
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमुळे टळली मोठी दुर्घटना -
शनिवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे दोन बंब तात्काळ रवाना झाली. आग लागल्यानंतर रुग्णालयात नर्स, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांनी रुग्णांना तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर सात जण गंभीर भाजले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रुग्णालयात नेमकी आग कशी लागली?
अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयाला ही आग नेमकी कशी लागली याबाबत अनेक तर्क लढवले जात आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र चौकशीअंती आगीचं नेमकं कारण समोर येईल.
हसन मुश्रीफ तातडीने नगरला रवाना -
या दुर्घटनेची माहिती मिळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तात्काळ घटनास्थळी रवाना होत आहेत. हसन मुश्रीफ हे सध्या कोल्हापुरात आहेत. "मला आमदार, जिल्हाधिकाऱ्यांचे फोन आले. त्यांनी रुग्णालयाला आग लागल्याची माहिती दिली. मी आता तात्काळ जाऊन माहिती घेईन. नेमकं काय घडलं हे तिथे गेल्यावर कळेल. या घटनेत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करुच, पण दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांना सरकारकडून मदतही दिली जाईल, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
ICU मध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ -
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाच्या ICU मध्ये आग लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुंबईत अनेक रुग्णालयात ICU मध्ये आग लागल्याच्या घटना काही दिवसापूर्वी घडल्या होत्या. शिवाय विरार, पालघरमध्ये अशाप्रकारच्याच घटना घडल्या होत्या. याशिवाय नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीने 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना एप्रिल 2021 मध्ये घडली होती.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार अपघातस्थळी भेट देणार
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार अपघातस्थळी भेट देणार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार नगरला येत आहे, पुढील दीड ते दोन तासात पोहचण्याची शक्यता असून अपघात ठिकाणी भेट देणार आहेत. ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
अहमदनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवावर अमित शाहंनी शोक व्यक्त केला
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयूला लागलेल्या आगीची दुर्दैवी घटना खरोखरच भीषण आहे. आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो - अमित शाह























