Ahilyabai Holkar : पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित्र
Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
![Ahilyabai Holkar : पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित्र ahilyabai holkar death aniversary know more about maratha empire marathi news Ahilyabai Holkar : पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/0060be8f28ac0c361507ccf3d527ea641660313139687358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. याच अहिल्याबाईंची आज पुण्यतिथी (तारखेप्रमाणे). अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे आणि नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर आणि इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक आणि परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अहिल्याबाईंच्या जन्मदिनानिमित्त जाणून घ्या त्यांच्या कार्याचा आढावा.
एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती
अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल आणि गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली. राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली (1772). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली.
मंदिरांचा जीर्णोद्धार केला
अहिल्याबाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव आणि गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले आणि कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.
अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा आणि दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत आणि शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)