(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : कधी पडणार पाऊस? बळीराजाचे डोळे आभाळाकडे, मराठवाड्यात तब्बल 44 टक्के पेरण्या बाकी
Agriculture News : जुलै महिन्याचा पंधरवाडा उलटून गेला तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस पडला नाही. पावसानं ओढ दिल्यानं राज्यातील बळीराजा चिंतेत आहे.
Agriculture News : यावर्षी राज्यात पावसानं (Rain) चांगलीच ओढ दिली आहे. जुलै महिन्याचा पंधरवाडा उलटून गेला तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस पडला नाही. पावसानं ओढ दिल्यानं राज्यातील बळीराजा चिंतेत आहे. यंदा पाऊस नसल्याने मराठवाड्यात (Marathwada) तर अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात आणखी तब्बल 44 टक्के क्षेत्रावरील पेरण्या बाकी आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्या देखील पावसाअभावी हातून गेल्या आहेत.
पुर्ण जून महिना गेला. आता जुलै अर्धा लोटला तरी पाऊस काय पडेना. त्यामुळं मराठवाड्यात तब्बल 44 टक्के क्षेत्रावरील पेरण्या बाकी आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्या देखील पावसाअभावी हातून गेल्या आहेत. खरीप हंगाम सुरु होऊन दीड महिना झालं तरी मराठवाड्यात सरासरी 146.06 मिमी एवढाच पाऊस पडला आहे. म्हणजे एकूण पावसाच्या 33 टक्के पावसाची तुट आहे. यामुळेच शेतकऱ्यांचे डोळे हे आकाशाकडे लागले आहेत. वेळ निघून जात असल्यानं जेमतेम पाऊस अन पाण्याच्या उपलब्धतेवर शेतकऱ्यांनी पेरणीचा जुगार खेळला अन तो त्यात हरला आहे.
दुबार पेरणी करुन केली तरीही...
परभणी जिल्ह्यातील वांगी शिवारातील शेतकरी रामभाऊ शिंदे यांना 10 एकर जमीन आहे. त्यांनी खते, बियाणे ऊसनवार घेत पाऊस पडेल या आशेने पेरणी केली. मात्र ती वाया गेली. पुन्हा त्यांनी दुबार पेरणी केली तर पाऊस आलाच नाही. आज त्यांचे सोयाबीन कुठे उगवले कुठे उगवलेच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. केवळ रामभाऊ यांचीच नाही तर प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती सारखीच झाली आहे. गोविंद शिंदेनी तीन एकरमध्ये सोयाबीन लावले मात्र, पावसाअभावी ते आलेच नाही. त्यामुळं पुर्ण तीन एकरवर त्यांनी नांगराने पाळी घातली आहे. आता दुबार पेरणीला पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय.
मराठवाड्यात 51 लाख हेक्टर लागवड क्षेत्रापैकी फक्त 29 लाख हेक्टरवर पेरणी
मराठवाड्यातील खरीप लागवड क्षेत्र हे 51 लाख 22 हजार 961 हेक्टर आहे. यापैकी 29 लाख 21 हजार 141 हेक्टरवर पेरणी झाली आहे. अजुनही 44 टक्के पेरणी बाकी आहे. ज्यात सोयाबीन अन कापसाचा समावेश आहे. आतापर्यंत मराठवाड्यात सरासरी 218 ते 238 मिमी पाऊस पडणे आवश्यक होते. मात्र, केवळ 146 मिमी पाऊस झाला आहे. तोही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. अद्यापही संबंध मराठवाड्यात शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहतायेत. दुसरीकडे वेळ निघून गेल्याने आता मूग अन उडीद शेतकऱ्यांना घेता येणार नाही. तसेच आता सोयाबीनच्या पेरणीवर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता शेतकरी शासनाकडे मदतीची मागणी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: