Agriculture News: अन्नधान्य- कडधान्य, गळीत पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा, शेतकऱ्यांना या तारखेपर्यंत होता येणार सहभागी
कृषी विभागामार्फत खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन, प्रथम पारिताषिक ५० हजारांचे
Agriculture News: राज्यातील विविध प्रयोग करुन पीक उत्पादकतेत वाढ करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे बक्षीस मिळणार आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगामाच्या (Kharif season) सुरुवातीला राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अन्नधान्य, कडधान्य आणि गळीत पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपातळीवर प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास यात ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळणार असून शेतकऱ्यांना ३१ जूलैपर्यंत या स्पर्धेसाठी अर्ज करता येणार आहे.
तालुका पातळीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकरी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. मूग, उडीद पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमुग, व सुर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
काय आहे पात्रता?
-प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र शुल्क असून सर्वसाधारण गटातील शेतकऱ्याला ३०० रुपये तर आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क आहे.
-स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वत:ची जमीन असणे आवश्यक असून ती तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे.
-एकापेक्षा अधिक पिकांसाठीही शेतकऱ्याला स्पर्धेत भाग घेता येतो.
-सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला भात पीक किमान २० आर तर इतर पिकांच्या बाबतीत १ एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
कागदपत्रे काय लागतात?
-स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला विहित नमुना अर्ज, प्रवेश शुल्क, सातबारा व ८-अ चा उतारा देणे आवश्यक आहे.
-आदिवासी शेतकऱ्याला जात प्रमाणपत्र देणे आवश्यक
-पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याला सातबाऱ्यावर घोषीत केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकीत नकाशा, बँक खाते, चेक, किंवा पासबूकच्या पहिल्या पानाची प्रत देणे आवश्यक आहे.
तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर बक्षीसे काय?
- तालुका पातळीवर जिंकणाऱ्या शेतकऱ्याला पहिले बक्षीस ५ हजार रुपयांचे, दुसरे ३ हजार रुपयांचे तर तिसरे बक्षीस २हजार रुपयांचे आहे.
- जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस १० हजार, दुसरे ७ हजार तर तिसरे बक्षीस ५ हजारांचे आहे.
- राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार रुपयांचे असून दुसरे ४० हजार तर तिसरे बक्षीस ३़० हजार रुपयांचे आहे.