OBC Reservation : ओबीसी समाज आक्रमक, नांदेडात तहसील कार्यालयासमोर थेट सरणावर बसून आमरण उपोषणास सुरूवात!
OBC Reservation : भोकर तालुक्यात ओबीसी आरक्षण बजाव समितीच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात संजय दिगंबर गौड आलेवार यांनी चितेवर (सरण) बसून आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.
नांदेड : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण व इतर मागण्या मान्य करू नये या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला आता मराठवाड्यातून पाठिंबा मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात देखील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.
सरणावर बसून आमरण उपोषण सुरूवात
भोकर तालुक्यात ओबीसी आरक्षण बजाव समितीच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात संजय दिगंबर गौड आलेवार यांनी चितेवर (सरण) बसून आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. या आंदोलणास सकल ओबीसी बांधवांनी पाठिंबा दर्शवला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण सुरू राहाणार असल्याचे ओबीसी बांधवाकडून सांगण्यात आले.
नांदगावमध्ये ओबीसींनी काढला मोर्चा
दरम्यान, ओबीसी समर्थनार्थ वडीगोद्रीत प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी नाशिकच्या नांदगावात आज ओबीसी बांधवांनी एकत्र येत मोर्चा काढला.. शहरातील हुतात्मा स्मारक येथून निघालेला हा मोर्चा थेट तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेण्यात आला.
ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करू नये, शासनाने प्रा.लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची दखल घेवून मागण्या त्वरित मान्य कराव्या, मनोज जरांगे यांच्या सगेसोयरे व सरसकट आरक्षणाची मागणी सरकारने अमान्य करावी.अशी मागणी यावेळी ओबीसी बांधवांनी केली. ओबीसी बांधवांच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार यांना देण्यात आले. दरम्यान, आंदोलकांनी ओबीसी समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
ओबीसी शिष्ठमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
दरम्यान, काल (20 जून) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेत मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज (21 जून) बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ओबीसी शिष्ठमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आज होणार आहे.
या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार (व्हीसी) मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे, धनंजय मुंडे (व्हीसीतून), पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, प्रा. के. पी. मुंडगे, लक्ष्मण गायकवाड, चंद्रकांत बावकर, जे डी तांडेल, मृणाल धोंडेपाटील, कमलाकर दरोडे यांच्यासह वडीगोद्री व पुण्यातील शिष्ठमंडळही उपस्थित राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या