(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातील हिंसाचाराप्रकरणी चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव यासह इतर काही ठिकाणी निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीला कोण जबाबदार आहे याची चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री म्हणाले.
नागपूर : अमरावती, नांदेड, मालेगाव शहारातील दंगल कशी झाली? हिंसक वळण कसं लागलं? याच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. गडचिरोलीत 26 नक्षलींना कंठस्थान घालणाऱ्या पोलिसांचं अभिनंदन वळसे पाटील यांनी केले. गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील हे नागपुरात ऑरेंज सिटी रुग्णालयांमध्ये नक्षलवादी चकमकीतमध्ये जखमी झालेल्या पोलीस जवानांच्या भेटीसाठी आले त्यावेळी ते बोलत होते.
गृहमंत्री म्हणाले, जखमी जवानांच्या तब्येतीत सुधारणा होत असून काळजी करण्याचे कारण नाही. ओळख न पटलेले नक्षलवादी हे महाराष्ट्रातील की छत्तीसगडचे हे काही दिवसांत स्पष्ट होईल. गडचिरोलीतील झालेल्या पोलीस नक्षलवादी चकमकीत देशातला सर्वात टॉपचा नक्षल कमांडर आणि 26 नक्षलींचा आकडा समोर आला असून हा आकडा वाढण्याची शक्याता आहे. सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. गडचिरोलीमध्ये एक पोलीस हॉस्पिटल आहे, मात्र त्यात सुधारणा गरजेची आहे. गडचिरोलीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे
त्रिपुरातील अल्पसंख्याक समुदायावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी मालेगाव, नांदेड आणि अमरावती येथे रझा अकादमीच्यावतीने मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चा दरम्यान दगडफेकही झाली होती. या घटनेनंतर रझा अकादमीचे नाव चर्चेत आले होते. या रझा अकादमीच्या कार्यालयात भाजप आमदार आशिष शेलार काय करत होते, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला. या विषयी गृहमंत्र्यांना विचारले असता, "आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक काय बोलले याची मला माहिती नाही", असे म्हणत उत्तर देण्याचे टाळले.
अनिल बोंडे यांना अटक
माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना अटक करण्यात आली आहे. अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडेंवर ही कारवाई केली आहे. दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा कलमांतर्गत डॉ. अनिल बोंडेंवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. भाजपकडून पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. डॉ. अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शनिवारी भाजपनं अमरावतीत आंदोलन केलं होतं. त्यात झालेल्या हिंसेला बोंडे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अनिल बोंडेंना अटक केली आहे.
संबंधित बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha