ABP Majha Impact : चाळीसगावातील पुरात दगावलेल्या गुरांच्या मृतदेहामुळं महामारी पसरण्याची भीती, एबीपी माझाच्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग
Chalisgaoun Flood : चाळीसगावातील पुरात दगावलेल्या गुरांच्या मृतदेहामुळं महामारी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एबीपी माझाच्या वृत्तानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Chalisgaoun Flood : चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर त्या ठिकाणी हजांराहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला होता. मात्र दोन दिवस होऊन देखील या जनावरांची विल्हेवाट प्रशासनानं लावली नसल्यानं अनेक गावांत दुर्गंधीमुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. याबाबतचं वृत्त एबीपी माझानं दिल्यानंतर प्रशासनानं त्याची गंभीर दखल घेत अनेक गावांत उघड्यावर पडलेली आणि पाण्यात पडलेल्या जनावरांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी झाल्यानं डोंगरी आणि तीतूर नदीला आलेल्या पुरात चाळीसगाव शहारासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरात आणि शेत शिवारात पाणी शिरलं. यामुळं घरांचं तसेच शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. अतिमुसळधार पाऊस आणि पूर मध्य रात्रीच्या सुमारास आल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील आणि घरासमोरील गुरं ही पुराच्या विळख्यात सापडली होती. पुराचा जोर जास्त असल्यानं ही जनावरं पाण्यासोबत गाव परिसरात आणि नदी नाल्यात विविध ठिकाणी मृतावस्थेत आढळून आली होती.
सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यानं प्रशासनानं नागरिकांपर्यंत जाण्याला प्रथम प्राधान्य दिलं होतं. मात्र मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याकडे प्रशासनचं दुर्लक्ष झाल्यामुळं अनेक गावांत दुर्गंधी पसरून महामारी पसरण्याचा धोका वाढला होता. यामुळे मृत जनावरांची तातडीनं विल्हेवाट लावावी, अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसून आली होती. या भागांत पुढाऱ्यांनी नुसते दौरे करण्यापेक्षा त्या दौऱ्याच्या खर्चातून जनावरं उचलण्यासाठी पैसे देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
शेतकऱ्यांच्या या मागणी संदर्भातील वृत्त एबीपी माझानं दिल्यानंतर याबाबत गंभीर दखल घेत तालुका प्रशासनानं आज अनेक गावांत मृत जनावरांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेतली होती. जेसीबी मशीनच्या सहाय्यानं अनेक गुरांचे मृतदेह आज जमिनीत गाडण्यात आल्यानं नागरिकांना दुर्गंधीपासून दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे तितुर आणि डोंगरी नदीच्या पुराचं पाणी पंधरा गावात शिरल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यातील अनेक गावांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणत पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणी सामना करावा लागला. रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. तर मोठ्या प्रमाणावर जिवीतहानीही झाली आहे.