कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे माळीनगरमध्ये उभे रिंगण पार पडले असते आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यात आज वेळापुरमध्ये धावा पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली असती.


प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर आज माळशिरस मुक्कामी असलेल्या माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याने सकाळीच वेळापूरसाठी प्रस्थान ठेवले असते. याच पालखी मार्गात सकाळी खुडूस फाटा येथे गोल रिंगण पार पडले असते. दुपारचा विसावा विझोरीमध्ये झाला असता आणि दुपारी चारनंतर धावबाची माऊंट येथे वारकऱ्यांचा धावा पार पडला असता. हाच धावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांसोबतच वारकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात जमले असते.


माऊलीच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण आज खडूस फाटा येथे पार पडले असते. खरतर इथुन पुढचे वारीतील सगळे खेळ मोठ्या उत्साहात पार पडत असतात. कारण इथून अवघ्या काही किलोमीटर वरती आता पंढरपूर आलेले असायचे. त्यामुळे जसजसे पंढरपूर जवळ येत होते तसं तसं वारकऱ्यांचा उत्साह आणखीनच वाढताना पाहायला मिळाला असता.



माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण पुरंदावडे येथे झाल्यानंतर गोल रिंगण याच मार्गामध्ये सकाळच्या वेळी खुडूस फाटा येथे झाले असते. इथून पुढच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये वाढणारी गर्दी यामुळे कोणता कार्यक्रम किती वेळ चालेल याचे नियोजन हे पालखी सोहळा प्रमुख करत असत. अगदी इथून पुढे होणाऱ्या रिंगण सोहळ्यात मानाच्या आश्वांनी किती फेऱ्या माराव्या हे ऐनवेळी ठरवले जायचे. पण कितीही गर्दी असली तरीही पालखी सोहळ्यातील उत्साह मात्र आणखीनच वाढताना पाहायला मिळायचा.


रिंगण सोहळा पार पडल्यानंतर याच ठिकाणी वारकर्‍यांनी सकाळची न्याहरी केली असती पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असायचा कारण याच मार्गामध्ये वारकऱ्यांचा धावा पार पडायचा. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचा दुपारचा विसावा येथून जवळ असलेल्या पिलवमध्ये पार पडला असता. हिरव्या गार गर्द झाडी नि नटलेल्या माळरानावर वारकरी दुपारच्या जेवणासाठी थांबले असते जेवण झाल्यावर थोडीशी उसंत घेऊन पुन्हा धावण्यासाठी सज्ज राहिले असते.



तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा..


एरवी वर्षभर ज्या धावबाची माउंट या ठिकाणी माणसे दुर्मिळ पाहायला मिळायची आज मात्र सकाळ पासूनच या ठिकाणी लोकांनी मोठी गर्दी पाहायला मिळत असायची. पूर्वीच्या काळी इथूनच पंढरपूरला जात असताना तुकाराम महाराजांना विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता आणि "तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा" असं म्हणत तुकाराम महाराज पंढरपुरच्या दिशेने धावत सुटले होते अशी आख्यायिका सांगितली जाते.


मी आतापर्यंत चार वेळा याच ठिकाणी थांबून हा धावा याची देही याची डोळा बघितला आहे. वारकरी मग तो पंधरा किंवा वीस वर्षाचा तरुण असो की, अगदी सत्तर वर्षाचा वृद्ध या ठिकाणाहून जात असताना तो चालत जाऊच शकत नाही. उलट एरवी चालतानाही ज्यांच्या पायाला गोळे येत असतील असे वृद्ध बाया बापड्यासुद्धा वायुवेगाने येथून धावताना मी पाहात आलो आहे. आता इथून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कळस दिसत नाही मात्र या जागेवरून धावताना विठ्ठलाशी वारकरी कसा एकरूप होतो याची अनुभूती मात्र निश्चितच पाहायला मिळत असे.



प्रथेप्रमाणे आज वारी निघाली असती तर चोपदारानी पालखी सोहळ्यातील मानाच्या वारकऱ्यांना एकेक करून पुढे सोडले असते. मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सुद्धा जेवढे लोक सहभागी झाले असतील त्या ही पेक्षा कितीतरी अधिक पटीने लोक या ठिकाणाहून धावताना पाहायला मिळायचे. म्हणूनच वारकऱ्यांसाठी आजचा दिवस मॅरेथॉनचा असायचा असं म्हटलं तर ते निश्चितच वावगे ठरले नसते.


वायू वेगाने धावणाऱ्या वारकऱ्यांसाठी धावा झाला की, लगेच खाली विसावा असायचा आणि याच ठिकाणी जंगी भारुडाचा कार्यक्रम करण्याची मोठी परंपरा या पालखी सोहळ्याला आहे. समाज प्रबोधन पर भारुड कार याठिकाणी वारकऱ्यांसाठी भारुड सादर करायचे त्यामुळे आजचा दिवस खरं तर संपूर्ण वारकऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरायचा. सकाळी गोल रिंगन दुपारी धावा. आणि धावा झाला की सायंकाळी भारुड यामुळे वारकरी तृप्त होऊन जायचे.


प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी आज वेळापूरमध्ये मुक्कामासाठी थांबले असते.



जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पाहिले उभे रिंगण माळीनगर मध्ये पार पडले असते.


प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे माळीनगरमध्ये पहिले उभे रिंगण पार पडले असते. अकलूज मुक्कामी असणाऱ्या पालखी सोहळ्याने सकाळीच बोरगावसाठी प्रस्थान ठेवले असते. सकाळच्या पहिल्याच विसावला माळीनगरमध्ये उभे रिंगण सुरु झाले असते. आतापर्यंत पालखी सोहळ्यामध्ये जितके ही रिंगण सोहळे पार पडले त्यात भर वस्तीत होणारा हा रिंगण सोहळा म्हणून माळीनगर मधला रिंगण सोहळा ओळखला जातो.


उभे रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी या पंचक्रोशीतील नागरिक सकाळपासूनच जमा झालेले असायचे. शाळेतील लहान मुलांना वारकऱ्यांच्या वेषात वेगवेगळे खेळ सादर केले जायचे. श्रीहरी नगरमध्ये तुकाराम महाराजांची पालखी पोहोचली की, वारकरी उभे रिंगण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे टाकायचे. मानाच्या आश्वाने एकदा पालखीचे दर्शन घेतले की, अश्वाचे पूजन व्हायचे आणि रिंगण करून उभ्या असलेल्या वारकऱ्यांच्या रस्त्यावरती एक फेरी मारून अश्वाने रिंगण पूर्ण केले असते.


रिंगण सोहळा पार पडल्यानंतर माळीनगरमध्ये प्रत्येक घरासमोर वारकऱ्यांना जेवणासाठीचा बेत असला असता. याच दरम्यान काही काळ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी हे मॉडेल हायस्कूलच्या ग्राउंडवर ठेवली गेली असती आणि इथे सुद्धा लोकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असत्या.


प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा आज वेळापूरमध्ये मुक्कामी राहिला असता. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बोरगावमध्ये विसावला असता.


क्रमशः


यापूर्वीच्या प्रवासाचे टप्पे :