VIDEO : आदित्य ठाकरे म्हणाले, ही चड्डी बनियन गँग, निलेश राणे सभागृहातच भिडले, ठाकरेंना चॅलेंज देत म्हणाले...
Aaditya Thackeray Vs Nilesh Rane : युतीधर्म पाळावा लागतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मित्र पक्षाच्या आमदारांवर कारवाई करता येत नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आठवड्याचा पहिलाच दिवस वादळी ठरल्याचं दिसून आलं. यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरले ते आदित्य ठाकरे आणि निलेश राणेंचा वाद. राज्यात चड्डी बनियन गँगचे काहीही सुरू आहे, युतीधर्मामुळे मुख्यमंत्र्यांना त्यावर कारवाईही करता येत नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्याला उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे चांगलेच भडकले. तुमच्याच जर हिंमत असेल तर नाव घ्या, नाहीतर सभागृहात असले शब्द वापरायचे नाहीत असं निलेश राणे म्हणाले.
राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी शिंदे गटाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला. त्यांनी शिंदे गटावर चड्डी बनियन गँग अशी टीका केली. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा त्यामागे संदर्भ होता. त्यावर लगेच निलेश राणेंनी त्यांना नाव घेण्याचं आव्हान दिलं.
Aaditya Thackeray Vidhansabha Speech : काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना युतीधर्म पाळणे गरजेचं असल्याने त्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागतात. ज्या लोकांसोबत ते बसलेत ते चड्डा बनियन गँग ते कुणालाही मारतात, काहीही करतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही.
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक याच्यासाठी करतो की त्यांनी मोठी सहनशिलता दाखवली. ते कुणावरही कारवाई करत नाहीत. मात्र सध्या राज्यात जे सुरू आहे, मुंबईत जे सुरू आहे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. चड्डी बनियन गँगवर कडक कारवाई करावी आणि शासन काय असते ते दाखवून द्यावं असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं.
Nilesh Rane Vidhansabha Speech : हिंमत असेल तर नाव घ्या
आदित्य ठाकरेंच्या या टीकेनंतर शिंदे गटाचे निलेश राणे चांगलेच भडकले. ते म्हणाले की, "त्यांनी हे जे काही शब्द वापरले, त्यांनी नेमकी कुणावर कारवाई व्हावी हे सांगावं. नेमकं चड्डी कोण आणि बनियन कोण हे त्यांनी सांगावं. जर नाव घ्यायला भीती वाटत असेल तर सभागृहात असे शब्द वापरू नयेत. जर हिंमत असेल तर ते शब्द कुणासाठी होते हे सांगावं. उगाच टीका करायची म्हणून काहीही बोललं जातं.
हे जे शब्द वापरले आहेत ते कुणासाठी आहेत, त्यांचे नाव घ्यावं. नाहीतर ते शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावे. बघूया त्यांच्यात किती हिंमत आहे ती असं थेट आव्हानच निलेश राणे यांनी दिलं.


















