Nashik News : आशीला मिळाली मायेची सावली! नाशिक जिल्ह्यातून पहिलं दत्तक मुलं यूएसएला जाणार
Nashik News : नाशिक जिल्ह्यातून आशी हिच्या रूपाने पहिलीच आंतरदेशीय दत्तक प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
![Nashik News : आशीला मिळाली मायेची सावली! नाशिक जिल्ह्यातून पहिलं दत्तक मुलं यूएसएला जाणार Aadhaar Shram girls are adopted by usa parents first case in nashik Nashik News : आशीला मिळाली मायेची सावली! नाशिक जिल्ह्यातून पहिलं दत्तक मुलं यूएसएला जाणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/a86a16fc306cabe73a0655a4ca85d7f01676375531115441_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : नवीन वर्ष हे प्रत्येकाच्या आयुष्यात नवी आशा, नवी दिशा घेऊन येत असते. यंदाच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील आधारश्रमातील बालिकेस हक्काचे पालक व घर मिळाले आहे. नाशिकच्या (Nashik) आश्रमातील चिमुरडीला विदेशातील हक्काचे आई-बाबा मिळाले असून हे बालक लवकरच नवीन आई-बाबांसह यूएसएला रवाना होणार आहे.
आज जिल्हाधिकारी (Collector) यांच्या कक्षात कुमारी आशी हिला दत्तक बालिका (Adopt) संदर्भातील कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून डेविन जमशेदी व लायनी जमशेदी यांच्या स्वाधीन करण्यात आले. जमशेदी हे कुटुंब युएसए येथील रहिवाशी असून या दाम्पत्यांस यापूर्वी एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी बालके आहेत. कुमारी आशी हिला जन्मत: एकच किडनी असून तिची जीभ टाळूला चिटकलेली असल्याने त्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. दत्तक नियमावलीनुसार असे बालक विशेष काळजी घोषित केले जात असून ते परदेशी पालकांना दत्तक म्हणून दिले जाते. त्यानुसार जमशेदी दाम्पत्याला जुळी बालके असतांना देखील त्यांनी विशेष काळजीचे बालक दत्तक घेण्याची ईच्छा व्यक्त केली होती. मागील 8 महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू होती आणि आज ती जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पूर्ण करण्यात आली.
कुमारी आशी हिच्या रूपाने नवीन दत्तक प्रणाली सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच आंतरदेशीय दत्तक प्रक्रिया नाशिक (Nashik) जिल्ह्यातून पूर्ण झाली आहे. तसेच आजपर्यंत देशांतर्गत या स्वरूपाचे 4 आदेश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पारित करण्यात आले आहेत, अशी माहिती जाधव यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अखात्यारीत असलेली एक विशेष दत्तक संस्था कार्यरत आहे. या संस्थेने नवीन दत्तक नियमावलीनुसार या बालकांचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे सादर केले होते. त्याअनुषंगाने दत्तक ग्रहण समितीच्या निर्णयाच्या अधीन राहून जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून बालकांच्या व पालकांच्या दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली. हे प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम आदेशाकरिता सादर करण्यात आले होते.
त्यानुसार आज जिल्ह्यातील आधाराश्रम संस्थेतील कुमारी आशी या बालिकेला जमशेदी या परदेशी दाम्पत्याने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या उपस्थितीत दत्तक घेतले आहे. कुमारी आशी हिला दत्तक देतेवेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भुषण काळे, आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहूल जाधव यांच्यासह दत्तक पालक डेविन जमशेदी व लायनी जमशेदी उपस्थित होते.
अशी असते प्रक्रिया
संभाव्य दत्तक इच्छुक पालकाला 'कारा' या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागते. नंतर तीस दिवसांच्या आवश्यक दस्ताऐवज पोर्टलवर अपलोड करावे लागतात. दत्तक विधानाची नियमावली असून दत्तक विधान मध्यस्थामार्फत होत नाही. त्यामुळे याप्रकरणी मध्यस्थ दिशाभूल करत असेल तर याविषयीची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला किंवा स्थानिक पोलिसांना असते. दरम्यान नाशिकमधील महिला व बालविकास विभागाच्या मान्यताप्राप्त आधाराश्रमात अनाथ व निराधार बालकांच्या संगोपन व पुर्नवसनाचे कार्य करण्यात येते. केंद्रीय दत्तक ग्रहन संसाधन (सी.ए.आर.ए) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रेग्युलेशन 2022 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार आज जिल्ह्यातील आधाराश्रम संस्थेतील कुमारी आशी या बालिकेला जमशेदी या परदेशी दाम्पत्याने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या उपस्थितीत दत्तक घेतले आहे, अशी माहिती आधाराश्रमाचे व्यवस्थापक तथा समन्वयक राहुल जाधव यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)