नागपुरात एका गायीच्या पोटातून काढलं तब्बल 80 किलो प्लास्टिक!
नागपुरात एका गायीच्या पोटातून तब्ब्ल 80 किलो पॉलिथिन निघालं आहे. पोटात पॉलिथिनचा भांडार असल्यामुळे आजारी पडलेल्या या गायीचा जीव वाचवण्यासाठी तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तिचा जीव वाचला आहे.मात्र, मानवी चुकांमुळे मुक्या प्राण्यांवर कसे आणि कोणते संकट ओढवतात हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
नागपूर : शहरात गायी केर कचऱ्यातून खाद्य खाताना पॉलिथिन (प्लास्टिक पिशव्या) ही गिळतात ही बाब काही नवीन नाही. नागपुरात एका गायीच्या पोटातून तब्ब्ल 80 किलो पॉलिथिन निघालं आहे. पोटात पॉलिथिनचा भांडार असल्यामुळे आजारी पडलेल्या या गायीचा जीव वाचवण्यासाठी तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तिचा जीव वाचला आहे.मात्र, मानवी चुकांमुळे मुक्या प्राण्यांवर कसे आणि कोणते संकट ओढवतात हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
मुक्या प्राण्यांबद्दलची दया म्हणा किंवा पुण्य कमावण्याची हौस. मोठ्या शहरातील गल्ली बोळात गायीला पोळी किंवा इतर खाद्य पदार्थ भरवणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र, गाईंसाठी खाद्य टाकणारे हे विसरतात की त्यांच्याकडून पॉलिथिनमध्ये टाकलेले हे अन्न गाईंसाठी किती धोक्याचे ठरू शकते. नागपूरच्या महाल परिसरात एक गाय पोटफुगीच्या त्रासाने जेरीस आली होती.अगदी तिच्या नाका तोंडातून फेस निघत होता. तिच्या अशी अवस्था ओळखून नागपुरातील गोरक्षणमधील कार्यकर्त्यांनी तिला गोरक्षण संस्थेत आणले आणि पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तिची तपासणी करून घेतली.
पशु वैद्यकांनी गायीला तपासून तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितलेआणि जेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गायीचे पोट तपासले. तेव्हा तिच्या पोटातून एक दोन किलो नव्हे तर तब्ब्ल 80 किलो प्लास्टिक निघाले. तेव्हा डॉक्टरसह सर्व गौरक्षक ही हादरून गेले.
पोटातून प्लास्टिक बाहेर काढताच अवघ्या काही तासात मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचलेली ती गाय आता उभी झाली. आता ती इतर गाईंसारखी हिरवा चारा खात आहे. रवंथ करत आहे. तिचा जीव वाचला आहे. दरम्यान तिच्या पोटातून निघालेल्या पॉलिथिनमध्ये रात्रीच्या वेळी विविध हॉटेल्समधून शिळं अन्न फेकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काळ्या पॉलिथिनचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे हॉटेलवाल्यांनी आपले हॉटेल स्वच्छ ठेवताना मुक्या प्राण्याचा जीव घेऊ नये असे आवाहन गौरक्षकांनी केले आहे.
एखाद्या मुक्या प्राण्याला दोन घास खाऊ घालून मोठा परोपकार केल्याच्या आविर्भावात फिरणारे अनेक असतात. मात्र, आपली कृती त्या मुक्या प्राण्याच्या हिताची आहे की त्याला धोक्यात टाकणारी आहे याचा विचार अशा तथाकथित प्राणी हितचिंतकांनी करण्याची गरज आहे.