रत्नागिरीत ठाकरे-शिंदे गटाचे नेते एकाच मंचावर, तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी शिजान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
7 January Headlines : राजकारणाच्या मैदानात एकमेकांवर टीका करणारे शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार चिपळूणमध्ये एकाच मंचावर असणार आहेत. अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अभिनेता शिजान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
आज रत्नागिरीत शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते एकाच व्यासपीठावर असणार आहेत. सुतार समाजाच्या मेळाव्याच्या निमित्ताने हे नेते एकत्र येणार असले तरी राजकीय फटकेबाजीदेखील होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीत ठाकरे-शिंदे गटाचे नेते एकाच मंचावर
चिपळूण - उद्या चिपळूणमध्ये सुतार समाजाचा रौप्यमहोत्सवी जिल्हा मेळावा आहे. या मेळाव्यात व्यासपीठावर ठाकरे गट शिवसेना नेते भास्कर जाधव त्याचप्रमाणे शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, जिल्हा खासदार ठाकरे गट नेते विनायक राऊत, राष्ट्रवादी आमदार शेखर निकम, ठाकरे गट राजापूर आमदार राजन साळवी, शिंदे गट खेड आमदार योगेश कदम आणि माजी आमदार रमेश कदम, शिंदे गट उपनेते सदानंद चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात कोण कोणाबद्दल काय बोलणार यावर राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे. शिवसेनेचे एकेकाळचे सर्व पदाधिकारी एकत्र असल्यामुळे पहिल्यांदाच शिंदे गट आणि शिवसेना आणि ठाकरेगट आपल्याआपल्यातले गटतट बाजूला एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. यावेळी कोकणातील सर्वच पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर येण्याची ही पहिलीच घटना आहे.
सिंधुदुर्ग - 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' अशा आशयाचे स्टिकर आमदार नितेश राणे यांनी तयार केले आहेत. हे स्टिकर उद्यापासून कणकवलीमध्ये गाड्यांवर लावणार आहेत.
नाशिक - खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. नाशिकमध्ये झालेल्या पक्षातील फुटीनंतर त्यांची ही पत्रकार परिषद होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेबाबत राऊत माहिती देण्याची शक्यता आहे.
पालघर: अभिनेता शिजान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
वसई अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी शिजान खानच्या जामीन अर्जावर आज वसई न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी शिजान खानला ठाणे कारागृहातून वसई न्यायालयात आणलं जाणार आहे.
पुणे - जी-20 निमित्ताने शनिवार वाड्यावर रोषाणाई, लाईट्स अॅण्ड म्युझिक शो रंगणार
- जी 20 च्या निमित्तान पुण्यातील वेगवेगळे चौक, रस्ते सुशोभित करण्यात येतायत. त्याचबरोबर अनेक वर्षं बंद असलेला शनिवार वाड्यातील संध्याकाळचा लाईट्स अॅण्ड म्युझिक शो पुन्हा सुरु करण्यात आला आहे.
- पिंपरी-चिंचवड मधील जागतिक मराठी साहित्य संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांचे भाषण होणार आहे.
- आमदार जयकुमार गोरे यांना पुन्हा पुण्यात दाखल करण्यात येणार आहे.गेल्या दोन दिवसात दगदग वाढल्याने आमदार जयकुमार गोरे यांच्या छातीतील वेदना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जयकुमार गोरे यांना रात्री पुन्हा पुण्याला हलविण्यात येणार आहे. फलटण येथे गेल्या 14 दिवसांपूर्वी भीषण अपघातात गोरे जखमी झाले होते. त्यांच्या पाय आणि छातीच्या बरगड्यांना इजा झाली होती. गुरुवारी त्यांना एअर अॅम्बुलन्सने बोराटवाडी येथे आणण्यात आले होते. खूप दगदग झाल्याने त्यांच्या छातीत तीव्र वेदना होवू लागल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात येत आहे.
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांचे महाराष्ट्र साहित्य परिषदेत 'लोकशाही आणि न्यायव्यवस्था' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जी व मुमुक्षरत्न सेतुकभाई अनिलभाई शाह यांच्या हस्ते, पवित्र जैन तीर्थ दर्शन सर्किटच्या (महाराष्ट्रातील पवित्र जैन तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा व सुविधांसाठी) लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित राहणार आहेत.
- कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबई मॅरेथॉन 15 जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. मुंबईची मॅरेथॉन यंदाच्या वर्षी कशाप्रकारे आयोजित केली जाणार, याबाबत आयोजकांकडून माहिती देण्यात येणार आहे.
सातारा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या गावी आहेत.
कोल्हापूर- श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा 75 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने शरद पवार कोल्हापुरात येणार आहेत. दिवसभर मान्यवर शाहू महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापुरात येणार आहेत.
नांदेड - नांदेड जिल्ह्यातील दाभड येथे 36 व्या अखिल भारतीय धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अखिल भारतीय धम्म परिषदेचे 40 वर्षापासून नांदेड येथे आयोजन होत आहे. चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, नेपाळसह देशभरातून बौद्ध भिख्खू व बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने या कार्यक्रमास हजेरी लावतात.
अहमदनगर - शिर्डी - इंजिनिअर असोसिएशनच्यावतीने बांधकाम क्षेत्रातील निगडित घटकांचा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता मालपाणी लॉन्स येथून निघणार असून प्रांताधिकारी कार्यालयावर जाणार आहे. वाळू व खडी मिळत नसल्याने बांधकामाशी निगडीत व्यापारी , बिल्डर, मजूर आदींचा सहभाग असणार आहे.
नागपूर - मनी बी इन्वेस्ट्मेण्ट तर्फे स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव ते सुवर्णमोहत्सव या 25 वर्षाच्या काळाला लक्षात घेऊन भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गुंतवणूकदारांसाठी "अमृतकाल इंव्हेस्टर एजुकेशन इनेशियटिव्ह कॉन्क्लेव्ह" चे आयोजन केले आहे. त्यात प्रसिद्ध अर्थतज्ञ, इन्व्हेस्टरचे मार्गदर्शन असणार आहे. याचे उदघाटन देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.. तर समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
- नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशात विदर्भाला काहीच न मिळाल्याने विदर्भवाद्यांचे आंदोलन होणार आहे.
अकोल्यात अखिल भारतीय गझल संमेलन
अकोला - उद्यापासून अकोल्यात दोन दिवसीय 'अखिल भारतीय गजल संमेलन' होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय चौकातील पोलीस लॉन्स येथील 'सुरेश भट गझल नगरी'त हे संमेलन संपन्न होत आहे. चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे हे या संमेलनाचं उद्घाटन करणारे आहेत. अमरावतीचे विभागीय आयुक्त आणि गझलकार दिलीप पांढरपट्टे हे संमेलनाध्यक्ष आहेत. गझलनवाज भिमराव पांचाळे यांच्या 'गझलसागर संस्थे'नं हे संमेलन आयोजित केलं आहे. दोन दिवस गझल मुशायरे आणि परिसंवादांची रेलचेल असणारे आहे.