4th May In History: या जगण्यावर शतदा प्रेम करायला लावणाऱ्या अरुण दातेंचा जन्म, टिपू सुलतानचा मृत्यू; आज इतिहासात
On This Day In History : म्हैसुरचा वाघ अशी ओळख असलेल्या टिपू सुलतान आजच्याच दिवशी श्रीरंगपट्टनमच्या युद्धात धारातिर्थी पडला.
4th May In History: आजचा दिवस हा देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी म्हैसुरचा वाघ अशी ओळख असलेला टिपू सुलतान धारातिर्थी पडला. श्रीरंगपट्टनच्या लढाईत ब्रिटिशांनी त्याला ठार मारलं. तर भावगीताच्या इतिहासातही आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असा संदेश देणारे गायक अरुण दातेंचा जन्मही आजच्याच दिवसाचा. यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे,
1799 : टिपू सुलतानचा श्रीरंगपट्टनच्या लढाईत मृत्यू
एकेकाळी ब्रिटिश ज्याच्या नावाने थरथर कापायचे अशा टिपू सुलतानचा (Tipu Sultan) आजच्याच दिवशी म्हणजे 4 मे 1799 रोजी मृत्यू झाला. ब्रिटिशांच्या विरोधात लढताना कर्नाटकातील श्रीरंगपट्टन या ठिकाणी टिपू सुलतान धारातिर्थी पडला. 20 नोव्हेंबर 1750 रोजी कर्नाटकातील देवनहल्ली येथे जन्मलेल्या टिपूचे पूर्ण नाव सुलतान फतेह अली खान शहाब होते.
टिपूच्या वडिलांचे नाव हैदर अली आणि आईचे नाव फकरुनिसान होते. हैदर अली म्हैसूर राज्याचे एक साधा सैनिक होता, परंतु त्याच्या सामर्थ्याच्या बळावर तो 1761 मध्ये म्हैसूरचा शासक बनला. वडील हैदर अली यांच्यानंतर 1782 मध्ये टिपू सुलतान म्हैसूरच्या गादीवर बसला. टिपूला शेर-ए-म्हैसूर म्हणून ओळखल जायचं. 4 मे 1799 रोजी वयाच्या 48 व्या वर्षी टिपू सुलतानची कर्नाटकातील श्रीरंगपटना येथे इंग्रजांनी निर्घृण हत्या केली. हत्येनंतर ब्रिटिशांनी त्यांची तलवार ब्रिटनला नेली. टिपूच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्य इंग्रजांच्या हाती आले.
1933 : प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म
बाबा कदम यांचा जन्म 4 मे 1929 रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव वीरसेन आनंदराव कदम असे असले तरी ते आपल्या वाचक परिवारात बाबा कदम म्हणूनच परिचित होते. 1965 साली त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. 'प्रलय' याच कादंबरीवर पुढे 'देवा शपथ खरं सांगेन' हा चित्रपटही निघाला.
1934: मराठी भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म
प्रसिद्ध मराठी भावगीत गायक अरुण दाते (Arun Date) यांचा जन्म 4 मे 1934 रोजी झाला. अरुण दाते 1955 पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. 1962 मध्ये 'शुक्रतारा मंदवारा' या अरुण दाते यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. अरुण दाते आपल्या कार्यक्रमांतही शुक्रतारा गाऊ लागले. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले. सन 2010 पर्यंत अरुण दाते यांचे शुक्रतारा या नावाने होणाऱ्या मराठी भावगीत गायनाचे 2500 हून अधिक कार्यक्रम झाले. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बमही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला लोकप्रियता प्राप्त करून दिली असे म्हणले जाते. अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती, पुष्पा पागधरे यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत. 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' हे अरुण दाते यांचे गाणे विशेष गाजलं. अरुण दाते यांनी 'शतदा प्रेम करावे' या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे.
1959 : पहिला ग्रॅमी पुरस्कार आयोजित
जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जात असून हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा 4 मे 1959 रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेल्समध्ये आयोजित करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्काराचे आयोजिन केले जाते.
1980 : आधुनिक कवी आणि नाटककार अनंत कानेकर यांचे निधन
अनंत कानेकर (Anant Kanekar) हे आधुनिक मराठी कवी, चतुरस्त्र लेखक आणि वृत्तपत्रकार होते. औरंगाबादच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे (1957) ते अध्यक्ष होते. साहित्य अकादेमीचे आणि संगीत नाटक अकादमीचे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्यपद त्यांनी भूषविले आहे. 1965 साली पद्मश्री होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला. 1971 मध्ये सोव्हिएट देश नेहरु पारितोषिकाचे ते मानकरी ठरले.
2008 : तबलावादक किशन महाराज यांचे निधन
बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक किशन महाराज यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील कबीरचौरा येथे एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. भारत सरकारतर्फे पद्मश्री (1973) आणि पद्मविभूषण (2002) या पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1973), हाफिज अलीखाँ पुरस्कार (1986), उस्ताद इनायत अलीखाँ पुरस्कार (2002), दीनानाथ मंगेशकर पुरस्कार इत्यादी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.