मनसुख हिरणची हत्या करण्यासाठी आरोपींच्या खात्यात टाकले 45 लाख रूपये, एनआयएची मुंबई सत्र न्यायालयात माहिती
एनआयएनं कोर्टाकडे आणखीन 30 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
मुंबई : मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी आरोपींच्या खात्यात 45 लाख रूपये जमा करण्यात आले होते. मात्र हे पैसे कोणी दिले होते?, याचा तपास करणं अजून बाकी आहे. त्यामुळे याप्रकरणी आरोरपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी राष्ट्रीय तपासयंत्रणा एनआयएच्यावतीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात करण्यात आली. एनआयएनं कोर्टाकडे आणखीन 30 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी विशेष एनआयए कोर्टानं तपासयंत्रणेला 9 जून रोजी आरोपपत्र दाखल करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ दिली होती. याप्रकरणी एपीआय सचिन वाझे, एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मासह अन्य काही पोलीस अधिकारी आणि इतरांना एनआयएनं अटक केली आहे.
जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या दक्षिण मुंबईतील निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी सोडण्यात आली. त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याच्या अचानक मृत्यूनंतर हे प्रकरण खूप गाजलं. त्यानंतर एनआयएनं याप्रकरणाची सारी सुत्र आपल्या हाती घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तचर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली होती. त्यानंतर हा तपासात नवनवी माहिती समोर येत गेली आणि एकापाठोपाठ एक मोठे खुलासे होत गेले. या प्रकरणात अटक करण्यात आलेली सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
संबंधित बातम्या :