2nd July Headlines: बुलढाण्यातील अपघातातील मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार; आज दिवसभरात
2nd July Headlines: समृद्धी महामर्गावर झालेल्या अपघातातील मृतदेहांवर सामूहिक अत्यंसंस्कार होणार आहेत. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे.
2nd July Headlines: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तर या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत पावलेल्या लोकांवर सामुहिक अंत्यसंस्कार होणार आहेत. यासाठी 25 पैकी 21 मृतांच्या नातेवाईकांनी यासाठी परवानगी दिली आहे.
मृतांवर सामूहिक अत्यंसंस्कार
बुलढाण्यात झालेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातात 25 मृतदेहांपैकी एकाही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. त्यामुळे सर्व मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार होणार आहेत. माहितीनुसार 25 पैकी 21 मृतांचे नातेवाईकांनी यासाठी परवानगी दिली आहे. आणखी 4 जणांच्या कुटुंबियांची यासाठी परवानगी मिळणे आवश्यक आहे. त्यामध्ये एक मु्स्लिम समाजाची महिला आहे. जर तिच्या कुटुंबियांकडून देखील परवानगी मिळाली तर मृतदेहांवर सामूहिक अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची पत्रकार परिषद
मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हे दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. चहल यावेळी आदित्य ठाकरेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे. सकाळी दहा वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
काँग्रेसकडून तेलंगणाच्या निवडणुकांच्या प्रचाराचं बिगुल वाजणार
कर्नाटकात मिळालेल्या यशानंतर राहुल गांधी आज खम्मम येथे सार्वजनिक सभा घेऊन विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं बिगुल वाजवणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता राहुल गांधी सभा घेऊन निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत.
राज्यात मान्सून पुन्हा जोर धरणार
तळकोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात 3 जुलैनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होत असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात कोल्हापूर, सातारा, सांगलीसोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 4 जुलैनंतर मुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. सोबतच मराठवाड्यात देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात होणार
साईबाबांच्या हयाती पासून सुरू झालेल्या गुरुपौर्णिमेला उत्सवाला आजपासून सुरूवात होणार आहे. हा उत्सव 2 ते 4 जुलै दरम्यान पार पडणार आहे. पहाटे काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीने उत्सवाला प्रारंभ होणार आहे. गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्त राज्यातील अनेक पालख्या सुद्धा शिर्डीत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.