शंभर टक्के लॉकडाऊन असलेल्या औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये 29 कैद्यांना कोरोनाची बाधा
औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये सध्या 1500 कैदी आहेत. जेलमध्ये प्रवेश देताना आवश्यक ती काळजी घेतली जाते. तरी देखील आतमध्ये असणाऱ्या कैद्यांना कोरोना कसा झाला हा प्रश्न निर्माण झाला आहे.
औरंगाबाद : शंभर टक्के लॉकडाऊन असलेल्या हर्सूल जेलमध्ये आज 29 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आला आहे . गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील क्षमतेपेक्षा जास्त कैदी असलेले सहा जेल शंभर टक्के लॉकडाऊन केली होती .त्यामध्ये औरंगाबादच्या हर्सूल जेलचा देखील समावेश होता.
हर्सूल जेलमधील कर्मचारी आत आतमध्येच राहतील अशी व्यवस्था देखील करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते. मग आतमध्ये असणाऱ्या कैद्यांना कोरोना कसा झाला हा प्रश्न निर्माण झाला आहे. जेल प्रशासनानं हलगर्जीपणा केला की, अन्य काही याची उत्तरं आता जेल प्रशासनाला द्यावं लागणार आहे. औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये सध्या 1500 कैदी आहेत. जेलमध्ये प्रवेश देताना सॅनिटायझर तसेच जेलमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखले जाते असे अनेक व्हिडिओ जेल प्रशासनानं माध्यमांना दिले होते.
कैद्यांची संख्या कमी व्हावी यासाठी सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या काही कैद्यांना सोडण्यात आलं होत. नवीन भरती होणाऱ्या कैद्यांसाठी शहरातील एका शाळेमध्ये तात्पुरतं जेल तयार करण्यात आलं होतं. त्यांना तिथे पंधरा दिवस ठेऊन नंतर जेलमध्ये प्रवेश दिला जात होता. मग कोरोना लॉकडाऊन असलेल्या जेलमध्ये पोहोचला कसा हा प्रश्न निर्माण होत आहे. या विषयी जेल प्रशासनाची बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. "मी बाहेर आहे माहिती घेऊन सांगतो", असं हर्सूलचे मुख्य अधिकारी जाधव यांनी सांगितले. त्यामुळे या घटनेची चौकशी होण्याची गरज आहे.