..तर विधानसभेला 100 टक्के 288 उमेदवार उभे करणार, जरांगेंची घोषणा; पडळकर म्हणाले, ओबीसीतून आरक्षण नाही मिळणार
मनोज जरांगे एका जुन्या खटल्यासंदर्भात आज पुणे न्यायालयात आले होते. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना त्यांनी 4 जूननंतर उपोषण करणार असल्याचं स्पष्ट केलं.
पुणे : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी लोकसभा (Loksabha election )निवडणुकीत थेट सक्रीय सहभाग घेतला नाही. कुणाला पाडायचंय त्याला पाडा, असे म्हणत मराठा समाजाला जरांगे यांनी आवाहन केले. मात्र, जरांगे यांच्या प्रभावाचा आणि मराठा आरक्षणाचा परिणाम परभणी, जालना आणि बीड लोकसभा मतदारसंघात दिसून आला. बीडमध्ये (Beed) मराठा विरुद्ध वंजारी किंवा ओबीसी असं राजकीय समीकरण ऐन निवडणुकीत पाहायला मिळालं. या जातीय समीकरणाला अनेकांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी जोडलं आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करणार असल्याची घोषणाच केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास आपण 288 मतदारसंघातून सर्व जाती-धर्माचे उमेदवार उभे करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं.
मनोज जरांगे एका जुन्या खटल्यासंदर्भात आज पुणे न्यायालयात आले होते. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना त्यांनी 4 जूननंतर उपोषण करणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, मराठा आरक्षण, बीड लोकसभा, जातीवाद आणि उपोषणावरही त्यांनी भाष्य केलं. यावेळी, विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात त्यांनी मोठी घोषणाच केली आहे. जर मराठा समाजाला ओसीबीतून आरक्षण मिळालं नाही, तर विधानसभेला 288 मतदारसंघातून उमेदवार उभे करणार असल्याची घोषणाच जरांगेंनी केली आहे. जरांगेंच्या या घोषणेनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषही केला. कुणबी आणि मराठा एकच आहेत, त्यामुळे जर ओबीसीतून आरक्षण दिलं नाही. तर, विधानसभेला 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं जरागें यांनी म्हटलं.
मराठा समाजाला शांततेचं आवाहन
जातीवाद आपल्याला मान्य नाही, मी दोन्ही समाजाला शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. मी जातीविषयी एकदाही बोललो नाही, मी ओबीसी बांधवाला कधीही चुकीचं बोललो नाही. नेतेच काहीही बोलतात, असे म्हणत जरांगे यांनी बीडमधील जातीय तणावावर भाष्य केलं. तसेच, पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी शांततेचं आवाहन केलं पाहिजे, पण ते करत नाहीत, असे म्हणत नाव न घेता जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.
ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही तर आम्ही 288 जागांवर उमेदवार उभे करू असं मनोज जरांगे यांनी म्हंटलं आहे. आता, जरांगेंच्या विधानावर आमदार गोपीचंद पडळकर यांनाही प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांना जी काही भूमिका घ्यायची तो त्यांचा प्रश्न आहे, मात्र सरकारने आणि न्यायालयाने त्यांना सातत्याने सांगितले आहे की, त्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. त्यामुळेच त्यांना स्वतंत्र आरक्षण दिले आहे, असं पडळकर यांनी म्हटले. तर धनगर आरक्षण सुप्रीम कोर्टात अडकले आहे, मात्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कायदेतज्ज्ञ नेता आमच्याकडे असल्याने त्यांनी धनगर आरक्षण संदर्भात आमच्या पाठीशी उभं राहण्याचे आश्वासन दिले असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हंटले आहे.
जरांगेंच्या घोषणेवर दरेकर म्हणाले
लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जरांगे पाटील एका समाजाचे नेतृत्त्व करतात. त्यामुळे, त्यांना वाटलं असेल तर, त्यांनाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, असे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.