21st July In History: राज्यातील रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे, गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म; आज इतिहासात
21st July In History: रोजगार हमी योजनेचे जनक समजले जाणारे विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांचा आज जन्मदिन आहे.
21st July In History: आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. राज्यातील विकासकामात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आणि ग्रामीण भागातील स्थलांतर कमी करण्यास हातभार लावणाऱ्या रोजगार हमी योजनेचे जनक समजले जाणारे विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांचा आज जन्मदिन आहे. त्याशिवाय सुप्रसिद्ध हिंदी गीतकार आनंद बक्षी यांचाही जन्म आजच्या दिवशी झाला.
1910: विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांचा जन्मदिन
ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी इतर राज्यांसाठी आदर्श ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक समजले जाणारे विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांचा आज जन्मदिन. वि.स. पागे हे राज्याच्या विधान परिषदेचे 18 वर्ष सभापती होते. गांधीवादी विचारांचा पगडा असणारे वि.स, पागे हे स्वातंत्र्यसैनिक होते.
रोजगार हमी योजनेचा कायदा तयार करून त्यांनी सरकारला सादर करुन त्याची अंमलबजावणी करणे, तिच्या प्रगतीचा आढावा घेणे, कालानुरुप बदल सुचवणे आदी कामे वि.स. पागे यांनी केली. रोजगार हमी योजनेमुळे ग्रामीण भागातील अकुशल मनुष्यबळाला स्वत: च्या परिसरात रोजगार मिळालाच, शिवाय विकासकार्यातही भर पडली. 1969 साली सांगली जिल्ह्यातील पागे यांच्या विसापूर या गावी रोजगार हमी योजना पहिल्यादा सुरू झाली. त्यानंतर ही योजना व्यापकपणे राबवण्यात आली.
वि. स. पागे हे वकील, समाजसेवक, राजकारणी, लोकप्रतिनिधी, चिंतक, अर्थव्यवस्थेचे अभ्यासक आणि प्रशासक होते. विधिमंडळाच्या कामकाजाच्या नियमांचा त्यांचा अतिशय सूक्ष्म अभ्यास होता. त्यामुळे सभापती म्हणून काम करताना त्यांची विधिमंडळातील कारकीर्द ही संस्मरणीय ठरली.
1930: गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म
आपल्या सदाबहार गाण्यांनी लोकांना वेड लावणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा आज जन्मदिन. बक्षी यांचा जन्म आताच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे काश्मीरी मोहयाल ब्राह्मण कुटुंबात झाला. आनंद बक्षी हे पाच वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. पुढे भारताच्या फाळणी दरम्यान 2ऑक्टोबर 1947 रोजी त्यांचे कुटुंब भारतात आले.
लहान वयातच आनंद टेलिफोन ऑपरेटर म्हणून सैन्यात भरती झाले. मात्र त्यांची इच्छा मुंबई येऊन चित्रपटसृष्टीत काम करण्याची होती. 1947 साली फाळणीनंतर बक्षी कुटुंब निर्वासित म्हणून भारतात आले. त्यावेळी मायानगरी मुंबईत येऊन त्यांनी चित्रपटात काम मिळावं म्हणून धडपड सुरू केली. मात्र त्यांना काम मिळालं नाही. यानंतर ते पुन्हा सैन्यात दाखल झाले आणि काही काळ तेथे कार्यरत राहिले. त्यानंतर त्यांनी गीत लेखनाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
आपल्या चित्रपट कारकिर्दीत बक्षी यांनी 4000 हून अधिक गाणी लिहिली. 1957 मध्ये त्यांना पहिली संधी मिळाली होती. 1963 मध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक राज कपूर यांनी त्यांना आपला चित्रपट 'मेंहदीं लगे मेरे हाथ' मध्ये गीत लिहण्याची संधी दिली. यातील गाणी प्रसिद्ध झाली.
'आराधना', 'अमर प्रेम' आणि 'कटी पतंग' सारखे चित्रपट आनंद बक्षी यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीला मैलाचा दगड ठरले. आनंद बक्षी यांनी चित्रपट निर्मात्यांच्या अनेक पिढ्यांसोबत काम केलं. काळानुसार त्यांच्या गीतांचे शब्द बदलत राहिले आणि रसिकांच्या मनावरील अधिराज्य कायम ठेवत राहिले. 1965 मध्ये 'जब जब फूल खिले' प्रदर्शित झाला, तेव्हा त्यांची 'परदेसियों से न अंखियां मिलाना', 'ये समां.. समां है ये प्यार का', 'एक था गुल आणि एक थी बुलबुल' ही गाणी खूप गाजली.
1930: मराठी इतिहास संशोधक रामचंद्र ढेरे यांचा जन्म
रामचंद्र ढेरे हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. प्राच्यविद्या संशोधन केंद्रात त्यांनी अभ्यासक म्हणून काम केले. त्यांनी प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, "त्रिविधा', श्रीपर्वताच्या छायेत आदी त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत.
1934: भारताचे माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांचा जन्म
भारताचे माजी कसोटीपटू चंद्रकांत तथा चंदू बोर्डे यांचा आज जन्मदिन. 1958 ते 1970 या कालावधीत त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले. बोर्डे यांनी 55 कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी 35.59 च्या सरासरीने 3061 धावा केल्या. तर, 52 बळी घेतले. त्याशिवाय, 251 प्रथम श्रेणीच्या सामन्यात 40.91 च्य सरासरीने 12, 805 धावा केल्या. तरस 331 बळी घेतले. भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. निवड समितीचे अध्यक्ष असताना झहीर खान, युवराज सिंह, मोहम्मद कैफ सारख्या युवा क्रिकेटपटूंना संधी मिळाली होती.
2007: प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून विजयी
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील या विजयी झाल्या. घेतली. 2007-2012 या कालावधीत त्यांनी राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली. देशाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. 21 जुलै रोजी त्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. तर, 25 जुलै रोजी त्यांना पदाची शपथ देण्यात आली.
इतर महत्त्वाच्या घटना
1879: क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी अटक केली
1883: कोलकाता येथे पहिल्या नाट्यगृहाची स्थापना
1899: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९६१)
1911: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९८८)
1947 - भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचा जन्म
1954 : जिनिव्हा परिषदेने व्हिएतनाम देशाचे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये विभाजन केले. 21 जुलै 1954 रोजी जिनिव्हा येथे झालेल्या एका परिषदेत इंडोचीनची फाळणी करण्याचे ठरले.
1960 : सिरिमावो भंडारनायके जगातील पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या
1983: अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
2001- दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन
2009 - किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचे निधन