(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CoronaVirus Yavatmal | 20 कोरोनाबाधितांचं रुग्णालयातून पलायन; यवतमाळमध्ये खळबळ
राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उंचावत असतानात आता हीच रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पण, यवतमाळमध्ये यादरम्यानच एक मोठं संकट आलं आहे.
यवतमाळ : राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उंचावत असतानात आता हीच रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पण, यवतमाळमध्ये यादरम्यानच एक मोठं संकट आलं आहे. जिल्ह्याच्या घाटंजी येथील कोविड केअर सेंटरमधून 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी पलायन केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
वैद्यकीय अधिकारी संजय पुराम यांच्याकडून घाटंजी पोलिसात सदर प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोग्य यंत्रणेकडून पलायन केलेल्या रुग्णांचा शोध घेण्याचं कामही तातडीनं सुरू करण्यात आलं आहे. घाटंजी तालुक्यातील आमडी गावचे 19 तर 1 वागदा गावचा रहिवासी असणाऱ्या या रुग्णांनी प्रशासनापुढं एक मोठं संकट उभं केलं आहे. शुक्रवारी तपासणी केली असता ते सर्व कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ज्यानंतर त्यांना घाटंजी येथील कोविड केयर सेंटर मध्ये दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, पळून गेलेल्या काही रुग्णांपैकी ठराविक प्रशासनाच्या हाती लागल्याचं वृत्त असून, त्यांना गृह विलगीकरणात ठेवल्याची माहिती समोर येत आहे. इतर रुग्णांचा तातडीनं शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांसोबतच ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचीही मदत घेतली जात असल्याचं कळत आहे.
Corona Update | राज्यात शनिवारी 67,167 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, तर 63,118 रुग्णांची कोरोनावर मात
राज्यात कोरोना रुग्णसंख्येमुळं आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येत आहे. पण, त्यातही कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून या सर्वच यंत्रणा अहोरात्र मेहनत घेतानाच दिसत आहेत. त्यातच बेजबाबदार रुग्णांच्या अशा कृत्यांमुळं फक्त त्यांनाच नव्हे तर, इतरांसाठीही यातून धोका निर्माण होत आहे. त्यामुळं या यंत्रणांनाही नागरिकांनी या संकटकाळात सहकार्य देणं आवश्यक आहे.