18th March In History : भारताचा आयुध निर्माणी दिन, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे जयंती, अभिनेते शशी कपूर यांचा जन्म; आज इतिहासात...
18th March In History : आज 18 मार्चचा दिवस ऐतिहासिक आहे. आज भारताचा आयुध निर्माणी दिन आहे. तर, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांचा जन्म दिवस आहे.
18th March In History : आज 18 मार्चचा दिवस ऐतिहासिक आहे. आज भारताचा आयुध निर्माणी दिन आहे. तर, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांचा जन्म दिवस आहे. अभिनेते शशी कपूर यांचा आज जन्म दिवस आहे. जाणून घेऊयात आजच्या दिवसातील इतिहासाच्या प्रमुख घडामोडी....
आयुध निर्माणी दिन Ordnance Factories Day
18 मार्च 1802 रोजी भारतातील पहिली आयुध निर्माणी सुरू झाली. भारतातील सर्वात जुनी Ordnance Factory कोलकातामधील कोसीपोरमध्ये आहे. आयुध निर्माणी दिनानिमित्त देशात विविध ठिकाणी शस्त्रास्त्रे प्रदर्शने आयोजित केले जातात. देशातील Ordnance Factory हे DRDO आणि आयआयटी सारख्या संशोधन संस्थांची मदत घेतात.
1594 : शहाजी राजे भोसले यांचा जन्म
स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांचा आज जन्म. बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली, असे म्हटले जाते. अहमदनगर जवळच्या भातवडी येथे झालेल्या युद्धात शहाजीराजे यांनी प्रथम गनिमी काव्याचा वापर केला.जिथे मोघल सैन्य वस्तीला होते त्या वरील भागात असलेल्या धरणाची भिंत फोडून दहा हजार सैन्यानिशी दोन लाख सैन्याच्या पाडाव केला. 16 सप्टेंबर 1633 रोजी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भिमगडावर (शहागडावर) लहानग्या मुर्तजा या निजमास मांडी वर घेऊन स्वतः सिंहासनाधिश्वर झाले. शहाजी राजे यांनी हे राज्य तीन वर्ष चालवले.
मुघल साम्राज्याचा बादशाह शहाजहान याने दख्खनवर स्वारी केली तेव्हा आदिलशाहीने त्यांच्याशी हातमिळवणी केली. तर, निजामशाही आणि शहाजी राजेंनी संघर्ष कायम ठेवला. निजामशाहीचा युवराज मुर्तजा हा मुघलांच्या हाती लागला. अखेर त्याला वाचवण्यासाठी शहाजी राजे यांनी शहाजहानसोबत तह केला. त्यानुसार, शहाजी राजे आदिलशाहीचे सरदार झाले. शहाजहानने सावधगिरी म्हणून शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली. त्या ठिकाणाहूनही त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र, आदिलशाहने त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले. पुढे शहाजी राजे यांचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्यक्षात उतरवले.
1858 : डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म
डिझेल इंधनावर धावणाऱ्या इंजिनचे संशोधक जर्मन तंत्रज्ञ रुडॉल्फ डिझेल यांचा आज जन्म. त्यांच्या नावरूनच डीझेल इंजिन हे नाव देण्यात आले. 1892 मध्ये त्यांनी डिझेल इंजिनचा शोध लावला.
1921 : भारतीय राजकारणी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.के.पी साळवे यांचा जन्म
नरेंद्रकुमार पी उर्फ एनकेपी साळवे यांचा जन्म दिवस. नामांकित चार्टड अकाऊटंट म्हणून त्यांची ओळख होती. पुढे त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये ते पोलाद आणि ऊर्जा मंत्रिपद भूषवलं होतं. साळवे यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या संयुक्त समितीच्या शिफारसीनुसार 1975 मध्ये भारतीय कर व्यवस्थेत महत्त्वाचे बदल झाले. साळवे रहे 1982 ते 1985 दरम्यान ते बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीत 1983 मध्ये भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. त्यांनी क्रिकेटमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. क्रिकेटमधील त्यांचे योगदान लक्षात घेऊन चॅलेंजर ट्रॉफीचे नामकरण एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफी असे केले.
1922 : महात्मा गांधी असहकार आंदोलनात अटक
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात ब्रिटिशांविरोधात देशभरात असहकार चळवळ सुरू झाली होती. या चळवळी दरम्यान उत्तर प्रदेशमदील चौरीचौरा या गावात हिंसक वळण लागले. 1922 रोजी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. जमावाने पोलिसांवर हल्ला करून पोलिस ठाण्याला आग लावली. त्यात 23 पोलीस मृत्यूमुखी पडले. पुढे 18 मार्च 1922 साली महात्मा गांधींना राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
1938 : अभिनेते शशी कपूर यांचा जन्म
अभिनेता बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा जन्म. शशी कपूर यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीवर छाप सोडली. चॉकलेट हिरो म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, त्यांनी एकाच पद्धतीच्या भूमिकांपेक्षा वैविध्य जपणाऱ्या भूमिका साकारल्या. रंगभूमीवर त्यांचे विशेष प्रेम होते. वडील पृथ्वीराज कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी पत्नी जेनिफिरसह मुंबईत पृथ्वी थिएटरची सुरुवात केली. शशी कपूर यांना पद्म पुरस्काराने आणि चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
1944 : आझाद हिंद सेनेचा भारतात प्रवेश
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला. आझाद हिंद सेनेच्या या धडकेनंतर ब्रिटिशांमध्ये खळबळ उडाली.
1948 : अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म
भारताचे अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म. एकनाथ सोलकर यांनी शालेय क्रिकेट गाजवले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात त्यांनी चांगली कामगिरी केली. जगातील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना आजही ओळखले जाते. बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर यांच्या फिरकी गोलंदाजीला शॉर्ट लेगवर सोलकर यांच्या क्षेत्ररक्षणाची दमदार साथ होती.