18th June Headlines: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, शिवसेना ठाकरे गटाचा राज्यव्यापी मेळावा; आज दिवसभरात
18th June Headlines: पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रमातून लोकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 102 वा भाग असणार आहे.
मुंबई: राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला लवकरच मुहूर्त मिळण्याची शक्यता असून त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा आज राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासह आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे,
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आहे. राज्य सरकारला 30 जूनला एक वर्ष पुर्ण होतं असताना मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न आहे. त्यामुळे आजच्या दिल्ली दौऱ्यामध्ये विस्ताराची यादी आणि तारीख ठरणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. आजच्या बैठकीनंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार 19 जून पूर्वी विस्तार करण्यावर शिवसेनेचा भर आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा राज्यव्यापी मेळावा
वरळीच्या एनएससीआय डोम येथे शिवसेना ठाकरे पक्षाचा राज्यव्यापी मेळावा होणार आहे. या मेळाव्याला राज्यभरातून सहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे. साधारण दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी शिबिरासाठी एकत्रित येत असल्याने या शिबिराला एक वेगळं महत्त्व असणार आहे. उद्धव ठाकरे या पदाधिकारी शिबिरामध्ये शिंदे फडणवीस सरकारवर कशाप्रकारे टिकेचे बाण सोडतात? सोबतच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना कोणता संदेश देतात याकडे लक्ष आहे.
शिबिराचा कार्यक्रम असा असेल
- शिबिराच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
- पहिल्या सत्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोविडवर जी यशस्वी मात केली त्यावर ध्वनिचित्रफीत दाखविण्यात येणार आहे.
- त्यानंतर शिवसेना नेते सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.
- दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी संगीतकार राहुल रानडे आणि सहकलाकार 'शिवसेनेचा पोवाडा' सादर करतील.
- त्यानंतर अंबादास दानवे, संजय राऊत यांची भाषणे होतील
102 वा मन की बात कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रमातून लोकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 102 वा भाग असणार आहे. मोदी 25 जून ऐवजी 18 जून रोजी संबोधित करणार आहेत. कारण ते 25 जून दरम्यान परदेश दौऱ्यावर असणार आहेत.
आशिष देशमुख यांचा आज भाजप प्रवेश
काँग्रेस मधून हकालपट्टी केलेले नेते आशिष देशमुख आज देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपुरात भाजप प्रवेश करणार आहेत.
पालखी सोहळा –
ज्ञानोबांची पालखी आज वाल्हेहून लोणद मुक्कामी असेल. पालखीचा लोणदमध्ये दोन दिवसांचा मुक्काम असेल. तर तुकोबांची पालखी आज उडंवडी गवळ्याची इथून बारामती शारदा विद्यालय येथे मुक्कामी असेल. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अजित पवार सहभागी होणार आहेत.
पंढरपूर – आज सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्यासाठी मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी मतदान पत्रिकेचा व्हिडीओ वायरल होत आहे. अभिजित पाटील यांच्या घड्याळ या चिन्हावर शिक्का मारलेली क्लिप व्हायरल होत आहे.