12th January In History : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती, सोलापूर हुतात्मा दिन; आज इतिहासात...
On This Day : आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. तर, स्वामी विवेकानंद यांचीही जयंती आहे.
12th January In History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदवलेल्या (Today History) असतात. आज राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे. तर, स्वामी विवेकानंद यांचीही आज जयंती आहे. हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवणारे कुमार गंधर्व यांचा स्मृतीदिन आहे. कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ आदी कार्यक्रम सादर केले आणि संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले.
1598: राजमाता जिजाऊ यांचा जन्म
स्वराज्यसंकल्पक छत्रपती शहाजी महाराज यांच्या पत्नी आणि रयतेचे स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, प्रेरणास्थान, गुरू राजमाता जिजाऊ अर्थात जिजाबाई भोसले यांची आज जयंती. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.
जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.
शिवाजी महाराज 14 वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. जहागिरीची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले.
1863 : स्वामी विवेकानंद यांचा जन्म
भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. नरेंद्रनाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते.रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते.ते पाश्चात्य गूढवादाने प्रभावित झाले. तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली.विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी ब्रिटिशशासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात त्यांनी योगदान दिले.
1893 मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला. या धर्म परिषदेत माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो...", या शब्दांनी सुरू केलेले भाषण चांगलेच गाजले.
रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामी विवेकानंद यांनी केला.
4 जुलै 1902 ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला.
1918: ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांचा जन्म
रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र चित्रपटनिर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकरांना ‘सी रामचंद्र’ हे नाव दिले.सी. रामचंद्र हे नागपूरच्या शंकरराव सप्रे यांचा गुणी शिष्य आणि पं.विनायकबुवा पटवर्धनांचे विद्यार्थी होते. त्यांनी मास्टर कृष्णरावांच्या गायकीचा एकलव्यासारखा अभ्यास केला होता. रामचंद्र चितळकरांना खरे तर नट व्हायचे होते.
अभिनयाचे वेड घेऊन ते मुंबईत आले होते आणि नाईलाजाने सहकलाकार म्हणून स्थिरावले. तेही काम मिळेनासे झाल्यावर ते थेट चित्रपट निर्माते सोहराब मोदींना भेटले. पडेल ते काम करायची त्यांनी तयारी दाखवली, तेव्हा मोदींनी चितळकरांना मीरसाहेब नावाच्या त्याकाळच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडे पाठवले.
दिग्दर्शक मास्टर भगवान आबाजी पालव ऊर्फ भगवानदादा यांच्यासोबत त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. त्यांच्या अनेक चित्रपटांना सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले.
लता मंगेशकर, महेंद्र कपूर, किशोर कुमार, हेमंत कुमार, मोहम्मद रफी अशा अनेक दिग्गजांनी सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली गीते गायली आहेत.
'आजा अब तो आजा','आधा है चंद्रमा', 'ईना मीना डिका', 'तू छुपी है कहाँ', 'शाम ढले खिडकी तले', 'शोला जो भडके' अशी अनेक गीते आजही रसिकांच्या मनात स्थान करून आहेत.
1931 : सोलापूर हुतात्मा दिन
स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने 1930 मध्ये 9 ते 11 मे असे तीन दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवले होते. मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या सोलापूरच्या चार हुतात्म्यांना 12 जानेवारी 1931 रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. हा दिवस सोलापुरात 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो.
सविनय कायदेभंगाची चळवळ मोडून काढण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी सोलापूरमध्ये कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, संघर्ष सुरू होते. 8 आणि 9 मे 1930 या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावावर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले.
संतप्त जमावाने मंगळवार पेठ पोलीस चौकीवर मोर्चा काढला, जमावाने पोलीस चौकीवर हल्ला करून एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून पेटवून दिलं. तर दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस चौकीला आग लावून आतमध्ये ढकलून दिलं. या घटनेमध्ये दोन पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यानंतर जमाव गोलचावडी येथील कोर्टाकडे गेला. कोर्टाची कागदपत्रे, इमारत त्यांनी पेटवून दिली. कलेक्टर हेनरी नाईट यांनी सोलापूरच्या परिस्थिती संदर्भात मुंबईला अहवाल पाठविला व लष्कराची मदत मागविली. याप्रकाृरणानंतर कलेक्टर नाईट हे रजेवर गेले. इतर इंग्रज अधिकारी पोलिसांच्या बंदोबस्तात रेल्वे स्टेशनवरच बसून होते. दरम्यान दि. 9-10-11 मे 1930 दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते. या कालावधीत कलेक्टर कार्यालय, फौजदार चावडीवर, सरकारी कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. स्वातंत्र्याच्या 17 र्षे आधीच सोलापूर नगरपालिकेवर तिरंगा फडकाविण्यात आला.
इंग्रजांनी 12 रोजी सोलापुरात लष्कर पाठवले आणि सोलापूरात मार्शल लॉ (लष्करी कायदा) लागू करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात करण्यासाठी दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले होते. मंगळवार पेठ पोलीस चौकीत आग लावण्याच्या गुण्ह्यावरून 13 रोजी जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा तर १४ मे रोजी मल्लप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना अटक करण्यात आली. मार्शल लाॅ च्यादरम्यान लष्कराने आंदोलक व काँग्रेस कार्यकर्त्यांवर अतिशय अमानुष अत्याचार केले. ब्रिटिशांनी आपल्या 150 वर्षाच्या राजवटीत सोलापूरमध्येच मार्शल लॉ लावला होता. मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन यांच्यावर खटले दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
2005: ज्येष्ठ हिंदी चित्रपट कलावंत अमरीश पुरी यांचे निधन
भारदस्त आवाज, संवादफेकीची खास शैली आणि विविध ढंगाच्या भूमिका ताकदीने साकारण्याची क्षमता असलेले अभिनेते अमरीश पुरी यांचा आज स्मृतीदिन आहे.
निशांत, मंथन आणि भूमिका यांसारख्या चित्रपटातून अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या अमरीश पुरी यांनी नंतर खलनायक चित्रपटसृष्टीत आपली अजरामर छाप सोडली. स्टीव्हन स्पीलबर्गच्या 1984 मध्ये आलेल्या "इंडियाना जोन्स अँड द टेंपल ऑफ डूम" या चित्रपटात त्यांनी मोलारामची भूमिका साकारली होती, ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. या भूमिकेचा इतका प्रभाव पडला की त्यांनी कायम मुंडन ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना खलनायकाच्याही अनेक भूमिका मिळाल्या. प्रामुख्याने व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम करूनही समांतर किंवा वेगळ्या चित्रपटांबद्दलची त्यांची आवड कायम राहिली आणि ते अशा चित्रपटांशीही जोडले गेले.
अमरीश पुरी यांनी 1960 च्या दशकात रंगभूमीच्या जगात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सत्यदेव दुबे आणि गिरीश कर्नाड यांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. संगीत नाटक अकादमीने 1979 मध्ये रंगमंचावरील त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान केला, जो त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील पहिला मोठा पुरस्कार होता.
अमरीश पुरी यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1971 मध्ये 'प्रेम पुजारी' मधून झाली. पुरी यांना हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करायला थोडा वेळ लागला, पण त्यानंतर यशाने त्यांच्या पायाशी लोटांगण घातले. 1980 च्या दशकात त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून आपली छाप सोडली. 1987 मध्ये शेखर कपूरच्या 'मिस्टर इंडिया' चित्रपटातील मोगॅम्बोच्या भूमिकेतून ते सर्वांच्या मनात प्रसिद्ध झाला. 1990 च्या दशकात त्यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'घायल' आणि 'विरासत' मधील सकारात्मक भूमिकांनी सर्वांची मने जिंकली.
अमरीश पुरी यांनी हिंदी व्यतिरिक्त कन्नड, पंजाबी, मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपट आणि हॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अमरीश पुरी अभिनीत काही प्रसिद्ध चित्रपटांमध्ये 'निशांत', 'गांधी', 'कुली', 'नगीना', 'राम लखन', 'त्रिदेव', 'फूल और कांटे', 'विश्वात्मा', 'दामिनी', '' करण अर्जुन, 'कोळसा' इ. त्याच्या खलनायकी भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते.
इतर महत्त्वाच्या घडामोडी
1705: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.
1854: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म.
1902: महर्षी न्यायरत्न धोंडीराजशास्त्री विनोद यांचा जन्म.
1976: इंग्लिश रहस्यकथा लेखिका अॅगाथा ख्रिस्ती यांचे निधन
1992: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचे निधन.
2005: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
2006: हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू.