बेळगावात दहा दिवसाच्या बाळावर गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी
बेळगावातील डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी दोन किलो वजनाच्या बाळावर अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करुन त्याला जीवदान दिले.

बेळगाव : बेळगावातील डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांच्या बाळावर गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. डॉ. प्रवीण तंबरलीमठ यांच्या नेतृत्वाखालील कार्डिअॅक सर्जननी दोन किलो वजनाच्या या बाळावर अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करुन बाळाला जीवदान दिले.
गोव्यातील एका महिलेने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यापैकी एका मुलीला जन्मानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तिचे शरीर निळे झाले. त्यामुळे बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. 2D इको तपासणी करुन पाहिली असता मुलीला ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट आर्टरिज हा विकार असल्याचे समजले. या विकारात हृदयातून निघणाऱ्या रक्तवाहिन्यांची जागा बदललेली असते. या मुलीला बेळगावच्या के एल ई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये कार्डिअॅक विभागात गोव्याहून आणून दाखल करण्यात आले. मुलीची तपासणी करुन डॉ. प्रवीण तंबरलीमठ यांनी जन्मत:च हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची जागा बदललेली असून त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. पालकांची समती घेऊन दहा दिवसाच्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आठ तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया चालली होती. केवळ पन्नास ग्राम वजनाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. पण डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारुन यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया झाल्यावर पंधरा दिवस बाळाला अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. पंधरा दिवसांनी बाळाला डिस्चार्ज देण्यात आला.
दहा दिवसाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ एम. व्ही. जाली यांनी डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. डॉ.निकुंज व्यास, डॉ.आनंद वाग राळी, डॉ.शरण गौडा पाटील आणि डॉ.निधी मानवी गोयल आदी डॉक्टरांचा शस्त्रक्रिया करण्यात महत्त्वाचा सहभाग होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
