Weather Update : पावसाने दिली दांडी, मृग नक्षत्रही कोरडे गेलं, शेतकऱ्यांची चिंता वाढली; पावसासंदर्भात हवामान विभागाच्या तंज्ञाचे नेमकं म्हणणं काय?
Maharashtra Rain: गेल्या मे महिन्यात राज्यात आणि प्रामुख्याने परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. मात्र यानंतर जुनमध्ये पावसाने मोठी उघडीप दिलीय. मृगनक्षत्र ही कोरडे गेले असून शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.

Maharashtra Rain : गेल्या मे महिन्यात राज्यात आणि प्रामुख्याने परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. मात्र यानंतर जुनमध्ये पावसाने मोठी उघडीप दिलीय. मृग नक्षत्र ही कोरडे गेले असून अनेक हवामान तज्ञांनी सांगितलेले अंदाजही चुकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. अशातच आता नेमका पाऊस कधी पडणार? पेरण्या खोळंबणार की वेळेत होणार याबाबत अधिक माहिती दिली आहे परभणीच्या वनाम कृषी विद्यापीठातील हवामान विभागाचे (Meteorological Department) प्रमुख डॉ कैलास डाखोरे (Dr Kailash Dakhore) यांनी. राज्यात 12 ते 19 जुन दरम्यान पाऊस पडणार असल्याचेही तंज्ञाचे मत आहे. (Maharashtra Weather Update)
शेतकऱ्यांनो हवालदिल होऊन जाऊ नका
राज्यात मान्सून दाखल होण्याची तारीख 9 जुन आहे. यंदा मान्सून लवकर जरी आला असला तरीही सध्या खंड दिलाय. शिवाय 12 ते 19 जून दरम्यान मराठवाड्यासह राज्यात मान्सून सक्रिय झालेला दिसेल आणि सर्वत्र पाऊस पडेल. त्यांनतर परत 26 जुन ते पुढे एक आठवडा पाऊस असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवालदिल होऊन जाऊ नये. पेरणीचा कालावधी जाणार नाही. असा सल्ला परभणीच्या वनाम कृषी विद्यापीठातील हवामान विभागाचे प्रमुख डॉ कैलास डाखोरे यांनी दिला आहे. सोबतच जोपर्यंत 100 मिलिमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असे देखील त्यांनी यावेळी सांगितलंय
विदर्भातील कमाल तापमान 40°च्या वर, नागपुरात 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
मृग नक्षत्र लागल्यानंतर शेतकरी आणि सर्वच वैदर्भीय मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असताना मान्सून लांबल्याचे चिन्ह तर आहेच. मात्र उन्हाळाच पुनरागमन करतो आहे की काय? अशी स्थिती नागपूर आणि विदर्भात निर्माण झाली आहे. कारण काल विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या शहरांमध्ये कमाल तापमान 40°च्या वर नोंदवला गेला आहे. नागपुरात काल (9 जून) कमाल तापमान 44.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस आणि सततच्या ढगाळी वातावरणामुळे मे महिना तापला नसला, तरी जून महिन्यात उन्हाळा पुनरागमन करतो आहे की काय अशीच स्थिती सध्या नागपूर आणि विदर्भात झाली आहे.
गोंदियाच्या देवरी तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा, अनेक गावात झाडं उन्मळून पडले
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात काल संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्याने हजेरी लावली. या वादळामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. तर देवरी तालुक्यातील हरदोली गावातील एका घरावर झाडं कोसळला. या घटनेत घरमालकाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या


















