NMC News : नोकरीसाठी पात्र सफाई कर्मचाऱ्यांच्या 100 वारसांची यादी प्रसिद्ध; 15 दिवसात नोंदवा लेखी आक्षेप
प्रकाशित करण्यात आलेल्या वारसदारांच्या नोकरीच्या अर्जावर कुटूंबियांना किंवा नातेवाईकांना आक्षेप असल्यास त्यांनी 15 दिवसाचे आत लेखी स्वरुपात मनपाकडे आक्षेप सादर करावे, असे आवाहन करण्यात आले.
नागपूर : लाड कमेटी शिफारशी पध्दतीनुसार मृतक किंवा निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांनी केलेल्या अर्जामधून पात्र ठरलेल्या 100 वारसांची यादी मनापातर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. 100 पात्र अर्जदारांची यादी मुख्यालयासह मनपाचे दहाही झोन कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि मनपाच्या nmcnagpur.gov.in/assets/250/2022/07/mediafiles/lad_list_100_04_07_2022.pdf या लिंकवर प्रकाशित करण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.
लाड कमेटी शिफारशी पध्दतीनुसार (Date 19/02/2019 ते 07/06/2019) मृतक/निवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी नोकरीकरीता अर्ज होत. यापैकी तपासणीत योग्य आढळलेल्या 100 पात्र अर्जदारांची यादी मनपाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. प्रकाशित करण्यात आलेल्या 100 वारसदारांच्या नोकरीच्या अर्जावर कोणत्याही कुटूंबियांना किंवा नातेवाईकांना आक्षेप असल्यास त्यांनी प्रकाशित करण्यात आलेल्या दिनांकापासून 15 दिवसाचे आत लेखी स्वरुपात मनपा मुख्यालयातील पाचव्या माळ्यावरील घनकचरा व्यवस्थापन विभागात आक्षेप सादर करावे. दिलेल्या विहित मुदतीनंतर कुठलेही आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाही, असेही घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी स्पष्ट केले आहे.
Nagpur : सोमवारी शहरातील 4651 घरांचे सर्वेक्षण
नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून सोमवारी 4 जुलै, 2022 रोजी शहरातील 4651 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. ही माहिती हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ.जास्मीन मुलाणी यांनी दिली.
सोमवारी झोननिहाय पथकाद्वारे 4651 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी 132 घरे ही दुषित आढळली म्हणजेच या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. याशिवाय 06 ताप असलेले रुग्ण आढळून आले. मनपाच्या चमूद्वारे 46 कुलर्स रिकामी करण्यात आले. 763 कुलर्समध्ये 1 टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर 1098 कुलर्समध्ये 2 टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच 65 कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.
डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरामध्ये किंवा परिसरात कुठेही डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू संबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.