Latur Unseasonal Rains: लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा; गारपिटीने शेतीचे नुकसान, वीज कोसळून एक मुलगी ठार, आठ बैल दगावले
Latur Unseasonal Rains: लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला.
Latur Unseasonal Rains: आज दुपारी लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Latur Unseasonal Rains) अक्षरशः कहर केला होता. पाऊस पडण्यापूर्वी जोरदार वारा आणि विजेचा गडगडाट सुरू होता. या पावसाने फक्त शेतीचे नुकसान केलं नाही. तर जीवितहानी ही झाली आहे. जोरदार पडलेल्या पावसाच्या वेळेस वीज पडून दापका येथील एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर आठ बैलांनाही प्राण गमवावे लागले आहेत.
निलंगा तालुक्यातील दुर्दैवी घटना
आज दुपारी निलंगा तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाची हजेरी होती. दापका येथे वीज कोसळून एक मुलगी जागीच ठार झाली असून होसूर येथे दोन तर हरीजळग्यात तीन भांगेवडी तीन बैल दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दापका मुबारकपूर तांडा येथील शेतात वीज पडून आरूषा नथुराम राठोड ही 14 वर्षांची मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत निलंगा पोलिसांनी सदरील घटनेचा पंचनामा केला आहे. सदरील मयत मुलीचे निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वीज कोसळल्याने बैल दगावले
निलंगा तालुक्यातील होसुर येथील शेतकरी बालाजी बिरादार या शेतकऱ्याच्या शेतात बांधलेल्या दोन बैलावर वीज कोसळल्याने दीड लाखाचे नुकसान झाले आहे. तर हरीजवळग्यातील शेतकरी रतन भगवान गिरी यांचे तीन बैल दगावले असल्याने मोठे नुकसान झाले आहे. भांगेवडीतदेखील तीन बैल दगावले आहेत. तलाठी मंडळ अधिकारी यानी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून अहवाल निलंगा तहसिलकडे दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे अंदाजे पाच लाख रूपयांचे नुकसान झाले असून संबंधित नुकसान झालेल्या शेतकऱ्याला शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
फळबाग आणि भाजीपाला शेतीला फटका
वादळी वा-यासह झालेल्या या पावसामुळे निलंगा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या फळबागेला फटका बसला आहे. तसेच या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने केसर आंबा, द्राक्ष आदी फळबागांचे नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसान झालेल्या बागांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस तर उदगीर परिसरात गारपीट
लातूर जिल्ह्यातील चाकुर निलंगा निटुर लातूर ग्रामीण भागात आज दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर उदगीर परिसरात गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसाने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण केला आहे. मागील काही दिवसात सतत होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे अर्थकारण कोलमडून पडले आहे..