Latur Crime News: वॉचमनकडून दोन शाळकरी अल्पवयीन मुलींवर अत्याचार
Crime News: पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून, संस्थाचालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी केली जात आहे.
Crime News: लातूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन शाळकरी अल्पवयीन मुलींवर एका वॉचमनकडून अत्याचार करण्यात आला आहे. खाण्यासाठी चॉकेलट देण्याचा बहाणा करून सहा व सात वर्षांच्या अल्पवयीन दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या वॉचमनला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. घटना उघडकीस आल्यानंतर पालकांमध्ये खळबळ उडाली असून, संतापही पाहायला मिळत आहे.
याबबत अधिक माहिती अशी की, लातूर येथील एका शाळेत शाळा भरण्यापूर्वी दोन लहान मुली बागेत खेळत होत्या. त्यावेळी शाळेचा वॉचमन संजय गोविंदराव कोळी (वय 46) हा तेथे आला. या दोघींना चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवून बाथरूममध्ये घेऊन गेला. तेथे त्याने या मुलींवर अत्याचार केला. त्यांनतर मुलींनी घडलेला प्रकार पालकांना सांगताच या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून वॉचमनला अटक करण्यात आली आहे.
एका दिवसाची पोलीस कोठडी...
शाळेत मुलांच्या सुरक्षेची जवाबदारी सुरक्षारक्षकावर असते. मात्र एका सुरक्षारक्षक असलेल्या या नराधमाने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला आहे. त्यामुळे मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पाच दिवसांपूर्वी अशीच घटना...
दोन शाळकरी अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर, अशीच एक घटना शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच दिवसांपूर्वी घडली असल्याचे सुद्धा समोर आले आहे. या ठिकाणी शाळेचा शिपाई ओंकार काळे याने शाळेतील एका अकरावर्षीय मुलीला वर्गाचा मॉनिटर करतो, परीक्षेत चांगले गुण मिळवून देतो असे सांगून विनयभंग केला. या प्रकरणीही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
पालकांमध्ये भीतीचे वातावरण...
पाच दिवसांत असे दोन गुन्हे दाखल झाल्याने शाळातील मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर पालकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. संस्थाचालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच सुरक्षारक्षकच असे कृत्य करत असेल तर मुलांना शाळेत कुणाच्या भरवशावर पाठवावे असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.