Election : निवडणूक आयोगाला बूट फाटेपर्यंत मारलं पाहिजे, काँग्रेस नेत्याची संतप्त प्रतिक्रिया, ठाकरेंची शिवसेनेचीही नाराजी
Election Commission : राज्यातील काही नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचं दिसून आलं.

मुंबई : 2 डिसेंबर रोजी होणारी काही ठिकाणची निवडणूक ही आदल्या दिवशी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक आयोगाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये लातूरमधील निलंगा नगरपरिषदेचा समावेश असून ती निवडणूक स्थगित केल्यामुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाला(Election Commission) बूट फाटेपर्यंत मारलं पाहिजे असं वक्तव्य लातूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी केलं. त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेने आणि वंचित बहुजन आघाडीनेही यावर नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार होतं. पण आदल्या दिवशी म्हणजे, 1 डिसेंबर रोजी मात्र, 24 नगराध्यक्ष आणि 150 हून अधिक नगरसेवकपदांसाठी होणारी निवडणूक ही पुढे ढकलली. आता ही निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार असून त्याचा निकाल हा 21 डिसेंबर रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही टीका केल्याचं दिसून आलं.
Election Commission : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन
निलंगा नगरपरिषदेची निवडणूक ऐनवेळी स्थगित करण्यात आली. यामुळे काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यांचे कार्यकर्ते आणि उमेदवार संतप्त झाले. निलंग्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत जोरदार आंदोलन करण्यात आलं. प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सर्व नियमांचे पालन करून निवडणूक प्रक्रिया पार पडली जात असते. मात्र ऐनवेळी असा निर्णय कसा येऊ शकतो असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय हा अतिशय चुकीचा आहे. निवडणूक आयोगाला बूट फाटेपर्यंत मारले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे यांनी दिली. भारतीय जनता पक्ष आणि निलंगाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना पराभव समोर दिसत असल्यामुळे ऐनवेळी असा प्रकार ते करू शकतात असा थेट आरोपही त्यांनी केला.
न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेल्या काही प्रभागातल्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतला. या निर्णयाचा फटका शेकडो उमेदवारांना बसला. राज्यातील 24 नगराध्यक्षपदाच्या तर तब्बल 731 प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. काही ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर हा निर्णय कोर्टानं घेतला.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं असून अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलता येत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आयोगाच्या निर्णय़ावर आक्षेप घेतला. तर विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांच्या सूरात सूर मिसळला.
निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर राज्य निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं. सर्व बाजूंचा विचार करुन आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्या असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून देण्यात आलं.
ही बातमी वाचा:
























