Dhananjay Munde : 'ठरवून दिलेले मार्क आहेत, पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडेच राहणार'; धनंजय मुडेंचा विश्वास
Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडेच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
लातूर : राष्ट्रवादीचे (NCP) पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडेच राहणार असल्याचा विश्वास मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार (6 ऑक्टोबर) रोजी निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्हावर सुनावणी पार पडली. तर यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेपर फुटायचा प्रश्नच येत नाही ठरवून दिलेले मार्क आहेत, असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. लातूर जिल्ह्यातील लोदगा या ठिकाणी त्यांनी भेट दिली. माजी आमदार पाशा पटेल यांच्या टिशू कल्चर आणि बांबू रोपवाटीकेसह बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या युनिट ला भेट दिली.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
मंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडेच राहणार. कारण राष्ट्रवादी पक्षाकडे सर्वाधिक आमदार, पदाधिकारी आहेत. त्यामुळे पेपर फुटायचा प्रश्नच येत नाही . ठरवून दिलेले मार्क आहेत. पक्ष हा संविधानावर चालतो. त्यामुळे निश्चितच मार्क आम्हाला जास्त पडणार आहेत आणि हा पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडेच राहणार'
शेतकऱ्यांची दिवळी गोड होणार - धनंजय मुंडे
'शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर 25 टक्के अग्रिम रक्कम दिली जाईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ज्या जिल्ह्याने ॲग्रीम रक्कमेसाठी मंडळं अधिसूचित केलीत, त्यातील काही अधिसूचित केलेली मंडळं पिकविमा कंपनीने मान्य केले नाहीत. सरकार कडून पिकविमा कंपनीला निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी आठ दिवसांचा वेळ मागितला आहे. काहीही करून दिवाळीच्या आत अधिसूचित केलेल्या मंडळाना 25 टक्के अग्रीम रक्कम दिली जाईल', असं कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
'म्हणून सोयाबिन संशोधन केंद्र परळीत झालं'
'सोयाबीन संशोधन केंद्राची मागणी लातूर जिल्ह्यातून झालीच नाही. यामुळे सोयाबीन संशोधन केंद्र परळी येथे करण्यात आलं. बीड जिल्ह्याची रेल्वे, अनेक कार्यलयं ही लातूरला नेण्यात आलं. पण त्यासाठी बीडकरांनी कोणतही आंदोलन केलं नाही. त्यामुळे तुम्हीही असं आंदोलन करु नका. यापेक्षा काही वेगळं आणि मोठं हवं असेल तर प्रस्ताव घेऊन या नक्की सहकार्य करु,' असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.