Latur Accident : बेशिस्त वाहन चालकांमुळे लातूरमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, दोघांवर गुन्हा दाखल
दुचाकीस्वाराला फरपटत नेणाऱ्या सुमो चालकास पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. या अपघातात गंभीर दुखापती झाल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
Latur Accident: लातूर शहरातील बाह्यवळण रस्त्याहून चाकूरकडे निघालेल्या टाटा सुमो गाडीने सारोळा चौकात समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याची घटना घडली. त्यामध्ये दुचाकीस्वार सूमोमध्ये अडकला, तरीही न थांबता चालकाने वाहन भरधाव चालवले. यामध्ये दुचाकीस्वार काही अंतरावर फरपटत गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. नयूम खाजामिया शेख टकारी (वय 40) असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
सुमो चालकाने यावेळी पळ काढत त्याचे वाहन मात्र गरूड चौकातून जोरात पळविले. त्याचा पाठलाग पोलीस आणि घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी केला. कोळपा येथे त्याचे वाहन थांबवून त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी पाठलाग करत चालकासह इतर दोन अशा तिघांना अटक केली आणि त्यांना विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आणले. अपघातग्रस्त सुमोही ठाण्यात आणण्यात आली. आरोपी हनुमंत कुमार बिराजदार ( वय 26, रा. सावळसूर ता. उमरगा) याच्याविरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latur Accident: गाडीवर दगडफेक
धडक झाल्यावर तो चालक तेथेच न थांबता वाहन जोरात घेऊन निघून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण सुमोमध्ये अपघातग्रस्त दुचाकी चालक नयूम खाजामिया शेख टकारी (वय 40) हे अडकले होते. त्यांना सारोळा चौकापासून काही अंतर फरपटत नेण्यात आले. यात नयुम शेख यांचा जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. सदर सुमो गरूड चौकात थांबवण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला. परंतु सुमो चालक आरोपी हनुमंत कुमार बिराजदार याने त्या ठिकाणाहून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस व स्थानिक नागरिकांनी त्या सुमोचा पाठलाग करुन थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडी थांबत नाही, हे लक्षात आल्यानंतर नागरिक आणि पोलिसांनी त्या गाडीवर दगडफेक केली. ती गाडी कोळपा येथे थांबविण्यात पोलीस आणि नागरिकांना यश आले.
Latur Accident: दुसरा अपघात छत्रपती शिवाजी महाराज चौकात
लातूर शहरातील त्रिस्तरीय उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गावर ऑटोने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे येथील वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. बेशिस्त आणि भरधाव वाहन चालकांमुळे एकाच दिवसात दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे वाहतूक सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.