(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivajirao Kalge : काँग्रेसवरील संकट टळलं, लातूरच्या खासदारांना मोठा दिलासा, शिवाजीराव काळगे यांच्या विरोधातील याचिका फेटाळली
Shivaji Kalge : लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार शिवाजराव काळगे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलासा दिला आहे.
लातूर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं (MVA) बाजी मारली होती. महाविकास आघाडीनं 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवला. तर, महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर, एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. राज्यातील बऱ्याच खासदारांच्या निवडी विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या खासदारांमध्ये लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे (Shivajirao Kalge ) यांचा देखील समावेश होता. शिवाजीराव काळगे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी याचिका दाखल केली होती. यामुळं काळगे अडचणीत आले होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयानं उदगीरकर यांची फेटाळून लावत काळगे यांना दिलासा दिला आहे.
लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका पहिल्याच सुनावणीत मुंबई उच्य न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली. वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी याचिका दाखल केली होती. याचिकाकर्ते उदगीरकर यांनी असे आरोप केले होते की खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी आपल्या गावाच्या प्राथमिक शाळेच्या निर्गम उताऱ्यात खाडाखोड करून स्वतःची मूळ जात हिंदू जंगम ऐवजी जंगम माला करून घेतली होती. निलंगा येथील विभागीय अधिकारी यांच्याकडून तसे जातीचे प्रमाणपत्र हस्तगत केले. पुढे याच प्रमाणपत्राच्या आधारे, खासदार शिवाजीराव काळगे यांनी लोकसभेची निवडणूक लातूर मतदार संघातून लढवली आणि विजयी झाले, असा दावा नरसिंग उदगीरकर यांनी केला होता.
शिवाजीराव काळगे यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार आणि भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा 61881 मतांनी पराभव केला होता. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं या जागेवरुन विजय मिळवला होता.
नरसिंग उदगीरकर कोण आहेत?
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे नरसिंह उदगीरकर यांना तिकीट देण्यात आले होते.लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथील रहिवाशी नरसिंग निवृत्तीराव उदगीरकर यांनी उदगीर विधानसभा राखीव मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती.नरसिंग उदगीरकर यांनी अधिकारी म्हणून विविध पदांवर काम केलं होतं. त्यांनी 2012 मध्ये शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नरसिंग उदगीरकर यांना 42 हजार 225 मते पडली होती.निवडणुकीच्या काळात ते जेवढे चर्चेत नव्हते त्यापेक्षा अधिक पराभूत झाल्यानंतर फॉर्च्युनर कार खरेदी चर्चेत आले आहेत.
इतर बातम्या :
मोठी बातमी! अखेर लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात