satyapal singh baghel : कोल्हापूरचे दोन्ही खासदार भाजपचे असणार का? कायदा मंत्री सत्यपालसिंह बघेल म्हणाले...
सत्यपालसिंह बघेल यांच्याकडे लोकसभा प्रवास योजनेंतर्गत 3 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचल्या आहेत का? हे पाहायचं असल्याचे त्यांनी सांगितले.
satyapal singh baghel : भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्ष आधीच तयारी सुरु केली आहे. केंद्रीय कायदा मंत्री सत्यपालसिंह लोकसभा प्रवास योजनेंतर्गत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी ते कोल्हापूरमध्ये आले आहेत. सत्यपालसिंह बघेल यांच्याकडे लोकसभा प्रवास योजनेंतर्गत 3 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचल्या आहेत का? हे पाहायचं असल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यात कोल्हापूरचे दोन्ही खासदार भाजपचे असणार का? असे त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, राजकारणात कोणत्याही शक्यतेचा इन्कार केला जातं नाही, कोणासोबत युती करायची हे वेळ आल्यावर ठरवलं जाईल, पण आमची राष्ट्रीय पार्टी आहे, वर्षानुवर्ष आम्हाला राहायचं आहे. त्यामुळे संघटना मजबूत करण्याचं आमच काम आहे.
कोल्हापूरसारख्या क्रांतिकारी जिल्ह्यात माझी निवड हे माझं सौभाग्य असल्याचे ते म्हणाले. मित्र कोण आणि शत्रू कोण हे वरिष्ठ ठरवतील, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शिवसेना भाजप युतीमध्ये कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहेत. मात्र, दोन्ही खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. अशा परिस्थितीत कोल्हापूरमध्ये भाजपकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
कोल्हापूर खंडपीठाबाबत काय म्हणाले?
दरम्यान, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरमध्ये व्हावे, यासाठी अविरत लढा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी कोणत्याशी खंडपीठाचा प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे ते म्हणाले.
भाजपकडून देशातील 144 मतदारसंघामध्ये विशेष लक्ष
लोकसभा निवडणुकीसाठी अजून दीड वर्षांचा कालावधी असला, तरी भाजपकडून आतापासून तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपकडून देशातील 144 मतदारसंघामध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांचा समावेश आहे.
शिवसेना बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात भाजपचा डोळा!
भाजपकडून ज्या 144 मतदारसंघात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, त्यामध्ये राज्यातील सर्वाधिक मतदारसंघ बंडखोर शिवसेना खासदारांचे आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टता करताना लोकसभा निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप एकत्रित लढणार असल्याचे सांगितले. त्यानुसार ही रणनीती असल्याचा दावा केला. मात्र, ज्या पद्धतीने भाजपकडून बंडखोरांच्या मतदारसंघात मोर्चबांधणीस सुरुवात केली आहे ते पाहता निश्चितच बंडखोरांसमोर कायदेशीर पेच निर्माण झाल्यास किंवा राजकीय तडजोड म्हणून भाजपच्या चिन्हावर मैदानात उतरवले जाणार का? हे येणारा काळच सांगेल.
कोणकोणत्या जागांवर भाजप लक्ष देणार?
बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले
बारामतीची निर्मला सीतारमण यांना जबाबदारी
बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना दिली आहे. त्या सप्टेंबरमध्ये बारामतीमध्ये येणार आहेत. भाजपच्या मिशन 45 साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 मतदारसंघ निवडले आहेत. त्यापैकी दहा मतदारसंघ शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या