Satej Patil: काळम्मावाडी धरणातील पाणी थेट पाईपलाईनच्या जॅकवेलमध्ये पोहोचले; सतेज पाटलांनी पाण्याला हात जोडले, डोळे पाणावले
Satej Patil: काळम्मावाडी धरणाचे पाणी थेट पाईपलाईनच्या जॅकवेलमध्ये पोहोचल्यानंतर सतेज पाटील यांनी या पाण्याला हात जोडले. जॅकवेलमध्ये पाणी पाहून सतेज पाटील यांचे डोळे पाणावले.
Satej Patil on Direct Pipeline: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूरच्या (Kolhapur News) थेट पाईपलाईन योजनेचा महत्वपूर्ण भाग असलेल्या जॅकवेलमध्ये काळम्मावाडी धरणातील पाणी पोहोचल्याने एक महत्वपूर्ण टप्पा पार झाला आहे. त्याचबरोबर पहिल्या 20 किमी पाईपलाईनचे टेस्टिंगसुद्धा यशस्वी झाला आहे. आमदार सतेज पाटील यांचा थेट पाईपलाईन हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पावरून बरीच राजकीय टिकाटिप्पणी सुद्धा झाली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर काळम्मावाडी धरणाचे पाणी थेट पाईपलाईनच्या जॅकवेलमध्ये पोहोचल्यानंतर सतेज पाटील यांनी या पाण्याला हात जोडले. जॅकवेलमध्ये पाणी पाहून सतेज पाटील यांचे डोळे पाणावले. यावेळी जलपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्यासाठी 53 किमी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेचे काम सुरू आहे. मात्र पुढील काही दिवसांमध्ये कोल्हापूरच्या नागरिकांना थेट पाईपलाईनमधून पाणी मिळणार आहे. आज (9 जुलै) आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव यांनी काळम्मावाडी धरण परिसरात जाऊन पाहणी केली.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हे पाणी शहरवासियांपर्यंत पोहोचवले जाईल, असे सतेज पाटील यांनी सांगितले. कोल्हापूरला (Kolhapur Direct Pipeline) स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याचे माझे स्वप्न पूर्णत्वास येत असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. येत्या दोन महिन्यांत उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण होताच योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन कोल्हापूरला कायमस्वरूपी स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार असल्याचे आमदार सतेज पाटील म्हणाले. योजनेच्या पूर्ततेमुळे आत्मिक समाधान लाभल्याचे त्यांनी सांगितले.
20 किमीपर्यंत चाचणी
दुसरीकडे, जॅकवेलमध्ये पाणी पोहोचल्यानंतर 50 एचपीच्या दोन पंपातून पाणी उपसून 20 किमीपर्यंत पाईपमधून चाचणी घेण्यात आली आहे. इंटेक विहीर, इन्स्पेक्शन विहिरीचे तसेच तिथून जॅकवेलपर्यंतच्या पाईपलाईन टाकून पूर्ण झाल्यानंतर जॅकवेलपर्यंत पाणी येण्याची प्रतीक्षा होती. धरणातील पाणी 613 मीटरवर पोहोचल्यानंतर पाणी इंटेक विहिरीत आले होते. तेथून ते जॅकवेलपर्यंत पाईपलाईनमधून गेले. यामुळे या योजनेतील महत्वाचा टप्पा पार पडला होता.
भूमीगत वीजवाहिनी नेण्यास परवानगी
दुसरीकडे बिद्री साखर कारखान्याच्या परिसरातून भूमीगत वीजवाहिनी नेण्याची परवानगी अध्यक्ष के. पी. पाटील व संचालक मंडळाने दिली आहे. त्यामुळे खोदाई सुरू करण्यात आली आहे. भूमिगत वाहिनी टाकण्याचे अंतर 4 किमी आहे. 23 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पंपिंग स्टेशनमधील पंप बसवण्याचे काम सुरू आहे. वीज वाहिनी टाकून झाल्यानंतर ते पंप सुरू होतील. पहिल्या 20 किमीची चाचणी झाल्याने आता पुढील पाईपची स्वच्छता केल्यानंतर महिनाअखेरपर्यंत पूर्ण योजनेची चाचणी घेतली जाऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर कोल्हापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या