Lumpy Skin Disease : सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे जनावरांचा मृत्यू दर कमी ठेवण्यात यश, राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा
राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे जनावरांचा मृत्यू दर कमी ठेवण्यात यश आल्याचा दावा, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला आहे.
Lumpy Skin Disease : पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा वेगाने प्रार्दुभाव होत असला, तरी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे जनावरांचा मृत्यू दर कमी ठेवण्यात यश आल्याचा दावा, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला आहे. त्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढत्या लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला. चर्मरोगाचा प्रसार वेगाने होतो हे मान्य करत त्यांनी प्रतिबंधात्मक लसीकरण ड्राईव्हमुळे प्रसार कमी व्हायला मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. आज सकाळपर्यंत राज्यात आठशे पशुधनाचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. राजस्थान आणि पंजाबच्या तुलनेत पशुधनाची संख्या जास्त असतानाही रोगावर नियंत्रण ठेवण्यात यश आल्याचे ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यात 93 टक्के लसीकरण
दरम्यान, कोल्हापूर पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण 93 टक्के पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. मृत पशुधन उत्पादकांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे सध्या मदत दिल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणासाठी शंभर टक्के खर्च सध्या सरकार करत असल्याने त्याची मदत शेतकऱ्यांना झाल्याचेही ते म्हणाले.
राजू शेट्टी यांनी एकदा वस्तुस्थिती सरकारकडून समजून घ्यावी
दरम्यान, पशुधन बचावासाठी आणि सरकारकडून झालेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना विखे पाटील म्हणाले की, राजू शेट्टी यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, यावर राजकारण होऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
सावंत यांचं विधान वस्तुस्थितीला धरून नव्हतं
मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजावरून केलेल्या खाज वक्तव्यावरून राज्यात संतापाची लाट पसरली आहे. यावरून सडकून टीका झाल्यानंतर तानाजी सावंत यांनी माफी मागितली. मात्र, मंत्र्यांनी अशी विधान करणे टाळल पाहिजे. सवंग लोकप्रियतेसाठी होणाऱ्या अशा विधानामुळे प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर होतो, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या